ठाकरे गटाची काँग्रेससोबत बैठक, नार्वेकरांसाठी मतांची जुळवाजुळव, भाजपही सावध

प्रतिनिधी, मुंबई : आगामी १२ जुलैला होणाऱ्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकींसाठी मतांची जुळवाजुळव करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची विशेष बैठक सोमवारी विधीमंडळात पार पडल्याचे समजते. यात प्रामुख्याने काँग्रेसकडे असणारी अतिरिक्त मते ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांच्या पारड्यात पडावीत, यासाठी या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. पाचव्या उमेदवारासाठी भाजपनेही सावध भूमिका घेतली आहे.

आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी १२ जुलैला निवडणुका होणार आहेत. यात प्रामुख्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा पाठिंबा असणाऱ्या जयंत पाटील यांच्यात लढत होणार असल्याचे चित्र जवळपास निश्चित आहे.

उमेदवार कोण कोण?

भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांना संधी दिली असून त्यात पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांचा समावेश आहे. तर अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे दोघे मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सध्याचे विधानसभेचे संख्याबळ लक्षात घेता साधारण २३ मतांचा कोटा प्रत्येक उमेदवारांना लागणार आहे.
Rohit Patil : राजकरणात ज्यूनिअर आर.आर. पाटलांची एंट्री, शरद पवारांकडून उमेदवारीचे स्पष्ट संकेत

काँग्रेसची मते वळवण्याचा प्रयत्न

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभेत १५ आमदार आहेत. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांना मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी इतर मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. सध्या विधानसभेत काँग्रेसकडे अतिरिक्त मते आहेत. त्यामुळे काँग्रेसची मते आपल्याकडे वळविण्यासाठी या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते. त्याशिवाय इतरही अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

मिलिंद नार्वेकर यांची संपत्ती किती? बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आमदारांची रवानगी हॉटेलमध्ये होणार

गेल्या विधान परिषदेत मतांची झालेले फाटाफूट लक्षात घेता यंदाच्या निवडणुकीतही घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला असून या आमदारांवर आता २४ तास नजर असणार आहे. याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते.