ठाकरेंना नडला ‘सुभेदार पॅटर्न’, शिंदेंनी रिपीट केला राणे फॉर्म्युला; बालेकिल्ला कसा निसटला?

ठाणे: एखाद्या जिल्ह्याची जबाबदारी एका नेत्याकडे सोपवली की मग पुन्हा त्या जिल्ह्यात लक्ष घालायचं नाही. त्या नेत्याला जो प्रदेश देऊन टाकायचा, त्याच्यावरच पूर्णपणे विसंबून राहायचं हा सुभेदार पॅटर्न उद्धव ठाकरेंना पुन्हा नडला आहे. नारायण राणेंनी १९ वर्षांपूर्वी बंड केलं. ते काँग्रेसमध्ये गेले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण शिवसेना ते सोबत घेऊन गेले. आता एकनाथ शिंदेंनीदेखील तोच कित्ता गिरवला. त्यामुळे १९ वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती झाली. सुभेदार पॅटर्न पुन्हा एकदा ठाकरेंना महागात पडला.

नारायण राणेंच्या बंडानंतर सिंधुदुर्गात शिवसेनेची वाताहत झाली. त्यातून ठाकरेंनी धडा घ्यायला हवा होता. पण तसं घडलं नाही. त्यामुळेच बंडानंतर शिंदे ठाण्यातील शिवसेना सोबत घेऊन गेले. त्याचा फटका राजन विचारेंना लोकसभा निवडणुकीत बसला. काँग्रेस, भाजपमध्ये एका जिल्ह्यात, शहरात दोन ते चार नेत्यांना पक्षाकडून बळ देण्याय येतं. काँग्रेसमध्ये घडलेल्या शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर हाच पॅटर्न वापरला. त्यामुळे एखाद्या नेत्यानं पक्ष सोडला तरीही जिल्ह्यातील, शहरातील पक्ष संपत नाही.
Lok Sabha Election 2024 Result: पराभवाचं खापर, सर्व्हेंचा वापर; लोकसभा निवडणुकीत दाणादाण उडाल्यानंतर महायुतीत धुसफूस
बाळासाहेब ठाकरे असो वा उद्धव ठाकरे, त्यांनी पक्षात काही सुभेदार निर्माण केले. मग त्या भागात तो नेता म्हणजेच शिवसेना असं समीकरण रुढ झालं. सिंधुदुर्गातील शिवसेना म्हणजे सबकुछ राणे असं गणित होतं. त्याचा फटका सेनेला राणेंनी पक्ष सोडल्यावर बसला. आता तीच गत ठाण्याची झाली आहे. राजन विचारे २०१४ आणि २०१९ मध्ये सेनेकडून निवडून आले. त्यावेळी त्यांच्या प्रचाराची, निवडणूक व्यवस्थापनाची बरीचशी धुरा शिंदेंकडेच असायची. सेनेत फूट पडल्यानंतर ठाण्यातील आमदार, माजी नगरसेवक शिंदेंसोबत गेले. त्याचा फटका ठाकरेसेनेला बसला आणि विचारे पराभूत झाले.

ठाणे, कल्याणच्या बदल्यात वरळी?
ठाणे लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची एकच सभा झाली. शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या सभा झाल्या नाहीत. राजन विचारेंचा उमेदवारी अर्ज भरायला आदित्य ठाकरे हजर होते. पण त्यानंतर झालेल्या प्रत्यक्ष बाईक रॅलीत त्यांचा सहभाग नव्हता. कल्याणमध्ये शिंदेसेनेच्या श्रीकांत शिंदेंसमोर वैशाली दरेकरांना संधी देण्यात आली. त्या उमेदवारीनं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंना जास्त त्रास द्यायचा नाही म्हणजे विधानसभा निवडणुकीत वरळीत आपली डोकेदुखी वाढणार नाही, अशी ‘अलिखित करार’ झाला होता का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.