आकाश-आदित्य यांच्या गप्पाटप्पा
आकाश आणि आदित्य लॉनवर गप्पा मारताना दिसत आहेत. त्यानंतर तिथे उद्धव ठाकरेही येतात. तेवढ्यात अंबानींच्या कर्मचारीवर्गापैकी कोणीतरी दाखल होतं आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आकाश अंबानी यांची पादत्राणं तिथे ठेवतं. ती घालून ठाकरे पितापुत्र निघतात. उद्धव यांनी आकाश अंबानींसोबत हस्तांदोलन केलं, तर आदित्य यांनी मिठी मारली.
ठाकरे आणि अंबानी कुटुंबाचे स्नेहाचे संबंध आहेत. उद्धव ठाकरे आणि मुकेश अंबानी यांच्यातील मैत्रीचं दर्शन अनेकदा घडलं आहे. साहजिकच पुढच्या पिढीतही ही मैत्री दृढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरे सहकुटुंब हजर
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यासाठी बॉलिवूड तारांगणापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकारही सहभागी झाले होते. बीकेसी येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये अनंत-राधिका संगीत सोहळा झाला. या सोहळ्याला उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे, दोन्ही सुपुत्र आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यासह उपस्थित होते.
तेजस ठाकरेंचा संगीत सोहळ्यात डान्स
संगीत सोहळ्यातील एक व्हिडिओ नुकताच समोर आला होता. त्यात सोशल मीडिया सेन्सेशन ऑरी हा ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील ‘ये लड़की हाए अल्लाह हाए-हाए रे अल्लाह’ या गाण्यावर स्टेजच्या मधोमध नाचत होता, तर मागच्या रांगेत उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे नाचताना दिसत होते. ऑरी, सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांड्ये, शिखर पहाडिया, वीर पहाडिया या बॉलिवूडमधील स्टार किड्ससोबतच तेजस ठाकरे गाण्यावर थिरकताना दिसले.