टीव्ही बघताना अचानक बिबट्या घरात शिरला, आजींची सॉलिड ट्रिक, आता पंचक्रोशीत धाडसाची चर्चा

प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे : पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मानवी वस्तीत बिबट्याचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. काल पुण्यातच महावितरणच्या कार्यालयात बिबट्या घुसल्याची घटना ताजी असतानाच आता आंबेगाव तालुक्यातील कळंब परिसरामध्ये घरात टीव्ही पाहत बसलेल्या आजीबाईंच्या समोर अचानक बिबट्या येऊन उभा ठाकला. मात्र आजीही धीराच्या निघाल्या, त्यांनी घाबरुन न जाता मोठमोठ्याने आरडाओरड केली. मोठ्या आवाजामुळे बिबट्या घरातून निघून गेला. या घटनेनंतर आजीच्या साहसाची चर्चा होऊ लागली आहे.

आंबेगाव तालुक्यातील कळंब आणि लौकी या गावांच्या हद्दीवर असलेल्या तुंबे मळ्यात हा प्रकार घडला आहे. लक्ष्मीबाई खंडू थोरात असं सत्तर वर्षांच्या आजीचं नाव आहे. आजीबाईंनी बिबट्याला हुसकावून लावलं असलं तरी शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

नेमकं काय घडलं?

रात्रीच्या वेळी आजी नेहमीप्रमाणे घराचा दरवाजा उघडा ठेवून टीव्ही पाहत बसल्या होत्या. आठ वाजत आले होते. टीव्ही पाहत असतानाच अचानक दारातून बिबट्या घरात शिरला आणि आजी समोर येऊन उभा राहिला.
Leopard in Pune Office : पुण्यात महावितरण कार्यालयात शिरला बिबट्या, टेबलच्या आडोशाला लपला आणि…

आजींचा आरडाओरडा

क्षणभर आजीही स्तब्ध राहिल्या. मात्र त्यानंतर त्यांनी घाबरून न जाता क्षणाचाही विलंब न लावता मोठ्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. या मोठ्या आवाजाने बिबट्या घरातून बाहेर गेला. यावेळी परिसरातील नागरिकांनी आजींच्या घराकडे धाव घेतली. आजूबाजूला बॅटरीचा प्रकाश दाखवत बिबट्याची पाहणी केली. यावेळी बिबट्या शेजारी असलेल्या ऊसाच्या शेतात गेल्याचे पाहायला मिळाले.
Pune Saras Baug : पुण्यातील सारस बागेत गणपती बाप्पासमोर गर्दी जमवून आरती, तरुणावर गुन्हा

आजींच्या धाडसाचं कौतुक

आजीने आरडाओरडा केला नसता, तर बिबट्याने आजींवर हल्ला केला असता, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आजीने दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सत्तर वर्ष वय असलेल्या आजीने घरात आलेल्या बिबट्याला कसे धाडसाने परतवून लावले, या घटनेची चर्चा परिसरामध्ये होऊ लागली आहे.

खेड जुन्नर आंबेगाव शिरूर या तालुक्यांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. बिबट्या मानवी वस्तीत दिसायला लागल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. यावर वन विभागाने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. बिबट्या घरात शिरू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.