ज्या योजनेने मध्य प्रदेश जिंकले-तीच योजना महाराष्ट्रात, महिलांसाठी दादांकडून घोषणांचा पाऊस!

मुंबई : मध्य प्रदेशातील तत्कालिन शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारच्या लाडली बहन योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार वय वर्षे २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना प्रतिमाह १५०० हजार रुपये देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्याचबरोबर महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करण्यालाठी एलपीजीचा वापर वाढावा, असे अधोरेखित करून पात्र कुटुंबांना वर्षाला तीन गॅस मोफत देणार असल्याची मोठी घोषणा अजित पवार यांनी केली.

महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. त्यामुळे या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारकडून महिलांना खूश करण्यासाठी त्यादृष्टीने महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. लाडली बहना योजनेने भारतीय जनता पक्षाला मध्य प्रदेश राज्य जिंकवून दिल्याने महाराष्ट्रातली विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचीच पुनरावृत्ती होण्यााची विद्यमान राज्य सरकारला अपेक्षा असल्याने महिला वर्गाला आकृष्ट करण्यासाठी राज्य सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडला गेला. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तसेच महिलांसाठी पिंक रिक्षा खरेदी योजना आदी घोषणा करण्यात आल्या.
लोकसभेत फटका, विधानसभेपूर्वी धडाका; महायुती गेमचेंजर योजना आणण्याच्या तयारीत; लवकरच घोषणा

महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देणार

स्त्री हा कुटुंबाचा आधार असते. आता ती समाजाचा केंद्रबिंदू होते आहे. कुटुंबाचे व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे. एकहाती कुटुंब सांभाळणाऱ्या आणि कर्तबगार पुरुष घडविणाऱ्या महिलाही आपल्याला पहायवला मिळतात. वेगवेगळ्या परिक्षांच्या निकालांवेळी तर मुलींची आघाडी आता नित्याची झाली आहे. अशा आपल्या कर्तृत्ववान माय भगिनींना संधीची कवाडे खुली करणे आणि प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आमचे कर्तव्य असल्याचे सांगत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करुन त्यांअंतर्गत वय वर्षे २१ ते ६० वयोगटातील महिलांना प्रतिमाह १५०० हजार रुपये देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. या योजनेसाठी ४६ हजार कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली असून जुलै महिन्यापासून योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

महिलांना तीन सिलिंडर मोफत

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतंर्गत महिलांना दरवर्षी तीन सिलिंडर मोफत देण्यात येणार असून, याचा अंदाजे दोन कोटी कुटुंबांना फायदा होणे अपेक्षित आहे. महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधन देणे ही आपली जबाबदारी आहे, असे सांगत एलपीजी सर्वांत सुरक्षित असल्याने इंधनाचा वापर वाढला पाहिजे. त्यामुळए गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडला पाहिजे यासाठी पात्र कुटुंबाला तीन गॅस मोफत देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.