राज्यसभेत काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या धर्तीवर जादूटोणाविरोधी कायदा देशभर लागू करण्याची मागणी बुधवारी केली. सभापती जगदीप धनखड यांनीदेखील जादूटोणाविरोधी कायद्याविषयी दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करून सदनाच्या पुढे मांडावी असे म्हटले आहे. ही स्वागतार्ह गोष्ट असल्याचे या पत्रकात अंनिसने नमूद केले आहे.
महाराष्ट्रात अंनिसच्या प्रयत्नातून झालेल्या जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत दैवी शक्तीचा दावा करणे आणि त्याद्वारे लोकांना फसवणे हा गुन्हा आहे. असाच कायदा देशभर लागू केला तर भोलेबाबासारख्या बाबांना आळा बसू शकेल. पूर्वी पोलिस कर्मचारी असलेल्या आणि पुढे जाऊन स्वतःला बाबा नारायण हरी म्हणवून घेणाऱ्या बाबाच्या विरोधातदेखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही अंनिसने केली आहे.
‘जिवाची काळजी घ्या’
या निमित्ताने ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विचार घरोघरी’ या अभियानात तयार झालेल्या २५ पुस्तिका हिंदीमध्ये अनुवादित करून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हज यात्रा, अमरनाथ यात्रा अशा अनेक धार्मिक ठिकाणी दर वर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांचे मृत्यू होतात. श्रद्धा जपताना आपला जीव आणि आरोग्य याची काळजी घ्यावी, असे आवाहन अंनिसच्या वतीने मिलिंद देशमुख, डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, अण्णा कडलास्कर, नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे, फारुख गवंडी, सम्राट हटकर, मुंजाजी कांबळे, प्रकाश घादगिने, प्रशांत पोतदार, मुक्ता दाभोलकर, विनोद वायंगणकर, अशोक कदम, प्रवीण देशमुख यांनी केले आहे.