लोकसभेप्रमाणे जागावाटपाचा चेंडू अखेरच्या टप्प्यात नेऊ नये, असे स्पष्ट आदेश राज्यातील प्रमुख नेत्यांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर जागावाटप निश्चित करताना मित्रपक्षांसोबत वाद होईल अशी कोणतीही वक्तव्ये करू नये, अशा कानपिचक्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना देण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने ‘मटा’शी बोलताना दिली.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र काँग्रेसने चांगले यश मिळविले. या निवडणुकीत काँग्रेसने एकूण १३ जागा जिंकून राज्यात सर्वाधिक जागा आपल्या नावावर केल्या. त्यामुळे काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साह संचारला आहे. एकीकडे लोकसभेच्या जागावाटपात सांगली, भिवंडी या जागांच्या झालेल्या घोळानंतर निकालात मात्र पक्षाने बजावलेल्या कामगिरीमुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे आतापासून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असून, लोकसभा निवडणुकीतील चुका टाळण्यासाठी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रातील नेत्यांना ताकीद दिली असून, आघाडीतील इतर पक्षांशी चर्चा करून त्वरित जागावाटप निश्चित करून घेण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष दक्षिण मध्य मुंबई, भिवंडी आणि सांगलीच्या जागेसाठी आग्रही होता. त्याशिवाय इतर पक्षांच्या तुलनेत काँग्रेसला आणखी काही जागांवर निवडणूक लढविण्याची इच्छा होती. मात्र, मित्रपक्षांनी त्या जागा न सोडल्याने लोकसभा निवडणुकीच्या निकालात त्याचा थेट परिणाम दिसून आला. त्याशिवाय लोकसभेच्या जागावाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ अखेरपर्यंत सुरू ठेवल्याने त्याचा थेट परिणाम झाल्याचे अनेक मतदारसंघांत दिसून आले.
आता विधानसभेत याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रातील नेत्यांना यासंदर्भात काळजी घेण्याची सूचना केली आहे. महाविकास आघाडीने जागावाटप लवकर निश्चित केल्यास त्याचा फायदा प्रचारासाठी आणि इच्छुक उमेदवारांना मतदारसंघ बांधणीसाठी होऊ शकतो. त्यामुळेच जागवाटपाचे सूत्र लवकरात लवकर चर्चा करून पूर्ण करावे, अशी सूचना देण्यात आली आहे. साधारण नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची घोषणा झाल्यानंतर या संदर्भात लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिली.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
काँग्रेसला हव्यात १५० जागा
‘काँग्रेसने लोकसभेत मिळविलेल्या यशानंतर विधानसभेत पक्षाला १५० जागा मिळायला हव्या,’ अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्याचवेळी काँग्रेस राज्यात मोठा भाऊ असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले होते. पटोले यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी कोणीही लहान-मोठा भाऊ नाही, असा दावा केला होता. काँग्रेस आणि शिवसेनेमधील हे हेवेदावे टाळण्यासाठी आता पक्षश्रेष्ठींनीही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांना ताकीद दिली असून वाद होतील, अशी कोणतीही वक्तव्ये करू नका, अशी सूचना केल्याचे समजते.