जागतिक आरोग्य संघटनेचा निष्कर्ष, उपचारांमध्ये प्रतिजैविक औषधांची मात्रा लागू पडत नसल्याची समस्या

प्रतिनिधी, पुणे : करोनाकाळात प्रतिजैविकांचा (अँटिबायोटिक्स) अतिप्रमाणात वापर झाल्याने आता उपचारांमध्ये प्रतिजैविक औषधांची मात्रा लागू पडत नसल्याची समस्या समोर येत आहे. करोनाच्या आठ टक्के रुग्णांना प्रतिजैविकांची गरज असताना प्रत्यक्षात ७५ टक्के रुग्णांना प्रतिजैविक औषधे देण्यात आल्याचा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात मांडण्यात आला आहे.प्रतिजैविकांच्या वापरामुळे करोनारुग्णांच्या प्रकृतीत फार सुधारणा झाल्याचेही दिसून आलेले नाही. त्यामुळे प्रतिजैविकांच्या अतिवापराने होणारे दृष्परिणाम टाळण्यासाठी पावले उचलणे आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हटले आहे.

जलसंकटाचे सावट! राज्यातील जलसाठा २९ टक्क्यांवर, छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक पाणीटंचाई
जागतिक आरोग्य संघटनेने ६५ देशांतील रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या चार लाख ५० हजार करोनारुग्णांच्या वैद्यकीय अहवालाची तपासणी केली. ही तपासणी जानेवारी २०२० ते मार्च २०२३ या कालावधीत करण्यात आली. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये प्रतिजैविकांचा सर्वाधिक वापर करण्यात आला. जगभरात करोनामुळे गंभीर झालेल्या जवळपास ८१ टक्के रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली. मध्यम आणि सौम्य लक्षणे असलेल्या करोनारुग्णांना प्रतिजैविके देण्याचे प्रमाण प्रत्येक देशांमध्ये वेगवेगळे दिसून आले आहे. प्रतिजैविके देण्यात आल्याने करोनारुग्णांच्या प्रकृतीत फरक पडला नाही. जीवाणू संसर्ग नसलेल्या रुग्णांमध्ये या औषधांमुळे दृष्परिणाम दिसून आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले आहे.

अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

– …करोनाकाळात गरज नसतानाही प्रतिजैविकांचा वापर.

– अतिवापरामुळे औषधांना दाद न देण्याची समस्या वाढली.

– जगभरात चारपैकी तीन रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली.

– प्रतिजैविके देऊनही करोनारुग्णांना फायदा नाही.

– आरोग्याच्या विविध समस्या निर्माण झाल्या.

अतिवापरामुळे दृष्परिणाम काय?

जीवाणू आणि बुरशी संसर्ग झाल्यानंतर प्रतिजैविकांचा वापर केला जातो. प्रतिजैविकांचा अतिप्रमाणात वापर झाल्यास त्या व्यक्तीचे शरीर या औषधांना दाद देत नाही. परिणामी रुग्णांना उपचार देताना गुंतागुंत निर्माण होते. त्यामुळे प्रतिजैविकांचा अतिप्रमाणात होणारा वापर थांबविणे आवश्यक असल्याचे मत वैद्यतीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.