जयंत पाटीलांनी पाकीट दाखवले.. विश्वजीत कदमांनी हात जोडले, उपस्थितांमध्ये पिकला हशा

सांगली, स्वप्नील एरंडोलीकर : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याने वातावरण तापले होते. त्यातच शिवसेनेनं पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर कॉंग्रेसचे नेते आणि विद्यमान खासदार विशाल पाटील यांनी पाकीट या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवत मैदान मारले. मात्र, विशाल पाटील यांना उमेदवारी मिळू नये यासाठी जयंत पाटील यांनीच प्रयत्न केल्याच्या चर्चा होत्या. यावरून विश्वजित कदम, विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर वाद रंगला होता. अशातच जयंत पाटील आणि विश्वजीत कदम हे शिराळा येथील कार्यक्रमात एकत्र आल्यानंतर त्यांच्या पाकीटावरून जुगलबंदी रंगली होती.

लोकसभेच्या निवडणूकी नंतर प्रथमच शिराळा येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभागीय कार्यालयाच्या नुतन इमारतीचा शुभारंभ प्रसंगी आ. विश्वजीत कदम व आ.जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आले. राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. मागील काही दिवसापासून विश्वजीत कदम आणि जयंत पाटील या दोन नेत्या विषयी सोशल मीडियावर उलट सुलट बोलले जात होते. यामुळे आज दोघेही काय बोलणार याकडे उपस्थितितांचे लक्ष लागून होते. मात्र, दोन्ही नेत्यांनी एकमेकांबद्दल स्तुती सुमने उधळत सुरुवात केल्याने सर्व काही अलबेल असल्याचे दिसून आले. मात्र, कार्यक्रमासाठी जात असतानाचा एक विडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

विश्वजीत कदम आपल्या सकाळपासूनच्या व्यस्त कार्यक्रमातून या उद्घाटन कार्यक्रम स्थळी उशीरा पोहोचले. यावेळी जयंत पाटील हे उद्घाटनाची फित कापून सर्व संचालक समवेत जीना संपून सभआगृहाकडे जात होते. यावेळी खिशात काय आहे म्हणत आ. जयंत पाटील यांनी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या खिशातील पाकीट काढले. महेंद्र लाड यांच्या वरील खिशामध्ये एक पाकिट असते, त्या पाकिटात स्वामी समर्थ यांचा फोटो असतो, शर्ट खिशातील ते पाकीट काढुन घेत जयंत पाटील हे महेंद्र लाड आणि मागे असणाऱ्या विश्वजीत कदम यांना म्हणले, “तुम्ही मागे असताना याची काय गरज आहे.!” असे उद्गार काढताच कदम हात जोडत हसले.

लोकसभेच्या निवडणूकीत विश्वजीत कदम हे विशाल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याने विशाल पाटील खासदार झाले. त्यावरून जयंत पाटील यांनी राजकीय मिश्कील करत यापुढे महेंद्र लाड यांच्या पाठीशी अशाच ताकतीने उभा राहवे अशी अपेक्षा कदमांना यानिमित्ताने सर्वांसमोर केली आहे.