चार महिलांच्या नावे बोगस मतदान, पोलीस आणि मतदारांमध्ये धक्काबुक्की, सांगलीतील धक्कादायक घटना

सांगली: सांगलीतील मालू हायस्कूलमध्ये मतदानासाठी आलेल्या चार महिलांच्या नावे बोगस मतदान झाल्याची घटना निदर्शनास आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर संबंधित महिलांनी जोरदार गोंधळ घातला. यावेळी पोलीस आणि मतदारांमध्ये धक्काबुक्कीचा देखील प्रकार घडला. सांगली लोकसभेसाठी आज मतदान पार पडत आहे.
चर्चा होऊनही तिकीट नाही, फडणवीसांनी नाराज नाईकांची समजूत काढली, नरेश म्हस्केंनी गणेश नाईक यांचे आशीर्वाद घेतले
मिळालेल्या माहितीनुसार, मतदानासाठी चार महिला या मतदान करण्यासाठी मालू हायस्कूलमधील मतदान केंद्रावर आल्या होत्या. यावेळी त्यांच्या नावावर यापूर्वीच मतदान झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. परंतु संबंधित महिलांनी आम्ही मतदान केलंच नाही तर कोणी आमच्या नावावर मतदान केलं, असा जाब विचारला. परंतु तुमच्या नावावर मतदान झालं असून तुम्हाला आता मतदान करता येणार नाही, असं केंद्राध्यक्षांनी सांगितल्यानंतर संबंधित महिलांनी गोंधळ घातला. मतदानावर ठाम असलेल्या महिलांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापटीचा प्रकार घडला. यामुळे सांगलीतील मालू हायस्कूलमध्ये बराच बोगस मतदानावरून गोंधळ सुरू होता.

संबंधित महिलांनी याबाबत तक्रार देखील केली असून त्यांचं पुन्हा वेगळ्या पद्धतीने मतदान घेण्यात आलं. परंतु हे बोगस मतदान कसं झालं? आणि कोणी केलं? याबाबत देखील आता चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान बोगस मतदानामुळे सांगलीतील मालू हायस्कूलमधील केंद्रावर मात्र बराच वेळ गोंधळ सुरू होता. दरम्यान सकाळपासून मतदान पार पडत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत ४१.३० टक्के इतके मतदान झाले. भर उन्हात देखील सांगलीकर हे मतदानासाठी बाहेर पडले असून तीन वाजेपर्यंत ४१. ३० टक्के मतदान झाले. सकाळी नऊ वाजेपर्यंत ५.८१ टक्के इतके कमी मतदान झाले होते. त्यानंतर सकाळी ११ पर्यंत १६.८१ टक्के इतके मतदान झाले. त्यानंतर एक वाजेपर्यंत २९.६५ टक्के इतके मतदान झालं होतं.