घाटकोपरमधील होर्डिंग ‘या’ कारणामुळे कोसळले, मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा मोठा दावा

प्रतिनिधी, मुंबई : घाटकोपरमधील महाकाय होर्डिंगच्या खांबाचा पाया कमकुवत असल्याने ते कोसळले. निकृष्ट पायामुळे हे होर्डिंग आज ना उद्या कोसळलेच असते, असा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी केला.महापालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या या होर्डिंगचा पाया फक्त पाच ते सहा फूट खोल होता. होर्डिंगचा १२० बाय १२० फूट एवढा मोठा आकार पाहता ही खोली फारच अपुरी आहे. त्यामुळे कमकुवत पायामुळेचे हे होर्डिंग कोसळले, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. दरम्यान, बचावकार्य पूर्ण करून अपघाताची जागा मोकळी होण्यासाठी आणखी सुमारे २४ तास लागतील, असा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला. मागील ४८ तासांहून अधिक कालावधी शोध आणि बचावकार्य सुरू आहे. होर्डिंगखाली दुचाकींसह अनेक वाहने अडकली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
थरथरते पाय, डोळ्यात आसवं, चेहऱ्यावर हतबलता; मृतदेह ताब्यात घेताना कुटुंबीय हेलावले

वांद्र्यातील मोठ्या होर्डिंगला नोटीस

महापालिकेच्या वांद्रे एच पूर्व विभागाने पश्चिम रेल्वेला नोटीस पाठवून वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील सर्व होर्डिंगचा ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ अहवाल मागितला आहे. वांद्रे स्थानक परिसरात पूर्वेला एकूण आठ होर्डिंग असून, त्यापैकी सहा होर्डिंगवर जाहिराती आहेत. एक फक्त लोखंडी सांगाडा आहे. एक मोठे होर्डिंग असून, त्याचा आकार १२० बाय १२० फूट असा आहे. त्यावर जाहिरात नसल्याचे या नोटिशीत म्हटले आहे. लोकलमधून हे होर्डिंग प्रवाशांना स्पष्ट दिसते.

‘व्हीजेटीआय’ शोधणार तांत्रिक कारण

घाटकोपर येथील होर्डिंग कोसळण्याच्या दुर्घटनेमागचे तांत्रिक कारण समजून घेण्यासाठी महापालिकेने बुधवारी ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती केली. ‘व्हीजेटीआय’ ही कौशल्यप्राप्त संस्था असून, तिचा तांत्रिक अभ्यास महत्त्वपूर्ण असल्याचे महापालिकेने संस्थेचे स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग विभागप्रमुख डॉ. केशव सांगळे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.