घरच्या घरी शिक्षणाने घेतली उत्तुंग भरारी, प्रचलित शिक्षणाऐवजी ‘प्रयोगशील’ शिक्षणाचा विद्यार्थ्यांचा फायदा

मुंबई : आपल्या मुलांना प्रचलित शिक्षणाच्या वाटांपलीकडे जात काही वेगळे शिकायला मिळावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. आपल्या मुलांचा कल, त्यांची आवड यानुसार रुळलेल्या वाटा सोडून त्या पलीकडे विचार करण्याचा पालकांचा प्रयत्न असतो. याच विचाराने करोनाकाळानंतर काही पालकांनी गृहशिक्षणाचा पर्यायही स्वीकारला. तर काही पालकांनी अगदी पहिलीपासूनच या पर्यायाचा अवलंब करत एकाच बोर्डाच्या पुस्तकांचा अभ्यास न करता विविध बोर्डाच्या अभ्यासक्रमातील पुस्तकांची तोंडओळख विद्यार्थ्यांना करून देत स्वतंत्र मार्ग निवडला. मुंबई आणि ठाण्यातील अशा काही विद्यार्थ्यांनी गृहशिक्षण पद्धतीने दहावीची परीक्षा दिली असून काहींचा निकाल जाहीर झाला आहे तर काहींचा निकाल लवकरच जाहीर होईल.दादरच्या अगस्त्य आमडेकरने आयजीसीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा वयाच्या १२व्या वर्षी दिली. अगस्त्य पहिलीपर्यंत शाळेत गेला आणि त्यानंतर गेली साडेसहा वर्षे तो गृहशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहे. युनेस्कोच्या उन्हाळा विशेष उपक्रमांमध्ये सहभागी होण्यापासून देशात फिरून इतिहास समजून घेणे, विविध क्रीडाप्रकार शिकणे या माध्यमातून त्याचे आई-वडील अमृता जोशी आणि गौरव आमडेकर यांनी त्याच्या शिक्षणाचा आवाका व्यापक ठेवला. गेल्या साडेसहा वर्षांमध्ये त्यांनी विविध अभ्यासक्रमाची पुस्तके त्याला वाचायला आणून दिली. त्याचे वाचन आठवी, नववीच्या वर्गातील आहे हे लक्षात आल्यावर मग त्याच्यासाठी दहावीच्या विविध बोर्डांच्या अभ्यासक्रमाची पुस्तके आणून त्याला जे अधिक आवडले त्यानुसार कोणत्या बोर्डाची परीक्षा देणार याचा निर्णय घेण्यात आला, असे त्याची आई अमृता जोशी यांनी सांगितले.
Oath Ceremony : नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त निघाला, राष्ट्रपती भवनात लगबग, ५ जूनलाही सोहळा शक्य?

अगस्त्यने अनिवार्य इंग्रजीसोबत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित हे विषय घेऊन दहावीची परीक्षा दिली असून यात तो अ श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला आहे. अगस्त्यने लहान वयात दहावीची परीक्षा दिल्याबद्दल त्याचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्येही नोंदले गेले आहे. अगस्त्यचा शिक्षणप्रवास पाहून इतर अनेक पालक गृहशिक्षणाबद्दल चौकशी करत असल्याचे जोशी यांनी सांगितले.

गृहशिक्षणावर विश्वास ठेवणाऱ्या पालकांची संख्या वाढत असल्याचेही त्या म्हणाल्या. गृहशिक्षण करताना दहावीची परीक्षेच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी विशेष मार्गदर्शनही घेतले. करोना काळातील ऑनलाइन शिक्षणाने पालकांनी या शिक्षणपद्धतीकडे अधिक वेगळ्या दृष्टीकोनातून पाहायला सुरुवात केल्याचेही दिसत आहे.

ठाण्यातील अक्षज मालशे या विद्यार्थ्यानेही यंदा दहावीची परीक्षा दिली आहे. गेली चार वर्षे गृहशिक्षणाच्या माध्यमातून त्याला शिकवण्यात येत असून दहावीची परीक्षा एनआयओएस बोर्डाच्या माध्यमातून दिली आहे. त्याला गणित आवडायचे, प्रयोगातून शिकलेले विज्ञानही आवडायचे. त्यामुळे त्याचा कल पाहून, वर्षभर गृहशिक्षणाचा प्रयोग करणाऱ्या पालकांशी बोलून मग शिक्षणाच्या ठराविक चौकटीबाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे त्याची आई डॉ. मानसी मालशे यांनी सांगितले.

एनआयओएस बोर्डाच्या माध्यमातून परीक्षा देताना विषय वैविध्य उपलब्ध झाले होते. कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त सात विषय घेऊन विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. यामध्ये अक्षजने इंग्रजी, गणित, विज्ञान यासोबतच चित्रकला आणि मानसशास्त्र हे विषय निवडले होते. यामुळे त्याला इतर वेळी दहावीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट नसलेल्या विषयांचीही तोंडओळख झाली. याचा फायदा त्याला पुढच्या शिक्षणाचा मार्ग निवडताना नक्की होईल, असा विश्वास त्याच्या पालकांनी व्यक्त केला आहे. गृहशिक्षण करताना इतर मदत घ्यायची नाही असे नसते, मात्र शिक्षणाचा हा मार्ग का निवडायचा आहे त्याबद्दल विचारांमध्ये स्पष्टता हवी, असे डॉ. मालशे यांनी आवर्जून सांगितले. ऑनलाइन माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचेही प्रमाण हळूहळू वाढत असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
SSC Result 2024: पालघरचा निकाल ९६.०७ टक्के; बारावीप्रमाणेच दहावीच्या परीक्षेतही मुलींनी मारली बाजी

‘आत्मविश्वास दुणावला’

ठाण्यातील काव्या राणे या विद्यार्थिनीनेही यंदा एनआयओएस बोर्डाच्या माध्यमातून दहावीची परीक्षा दिली आहे. करोना काळात ऑनलाइन पद्धतीने झालेल्या शिक्षणानंतर गृहशिक्षणाचा पर्याय स्वीकारल्याचे काव्याची आई अस्मिता राणे यांनी सांगितले. सहावीपर्यंत काव्या शाळेत जात होती. या काळात तिच्या पालकांनी गृहशिक्षणाबद्दल ऐकले होते मात्र या पर्यायाबद्दल साशंकता होती. करोना काळाने गृहशिक्षणाचा आत्मविश्वास दुणावल्याचे तिच्या पालकांनी सांगितले. आपल्या पाल्याने केवळ परीक्षार्थी बनू नये या दृष्टीने गृहशिक्षणाचा निर्णय अधिक योग्य वाटत असल्याचेही ते म्हणाले. करोनानंतर पालक गृहशिक्षण, नो स्कूलिंग, ऑनलाइन शिक्षण अशा अनेक पर्यांयाचा अधिक खुलेपणाने विचार करत असल्याचे दिसत आहे, असेही हे पालक सांगत आहेत.