बारामती लोकसभा मतदान दरम्यान गोंधळ झाल्याने त्यावरून वाद झाला होता. त्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार ही केली होती. आता बारामती लोकसभेच्या मतदानानंतर सुरक्षितरित्या ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही सुमारे पाऊण तास बंद पडल्याचा आरोप सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी केला आहे. याबाबत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्याकडे लेखी तक्रारही केली आहे. तर सुळे यांनी अशा महत्त्वाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही बंद असणे संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे.
याबाबत त्यांनी ”एक्स”वरील पोस्टमध्ये हा प्रक्रार निष्काळजीपणाचा असल्याचा आरोपही केला आहे. तक्रार केल्यानंतर संबंधिताकडून योग्य उत्तर मिळाले नसल्याचेही त्यांनी सांगितले. या ठिकाणी एकही तंत्रज्ञ उपस्थित नव्हता. तसेच तक्रारीनंतरही आमच्या प्रतिनिधींना गोदामात सोडले नाही. हा प्रकार गंभीर असून केंद्रीय निवडणूक आयोगाने यात तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी या पोस्टद्वारे केली आहे.
दरम्यान, द्विवेदी यांनी सीसीटीव्ही बंद नसल्याचा दावा केला आहे. ”या ठिकाणी इलेक्ट्रीशियन काम करत होता. त्याने या टीव्हीची केबल काढल्याने स्क्रीनवरील डिस्प्ले काही काळासाठी बंद होता. मात्र, सीसीटीव्ही सुरूच होते. याचे फुटेज कायम आहे. आता टीव्ही स्क्रीनवरील डिस्प्ले सुरू करण्यात आले आहे”, असेही द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे.