काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हे आणि वॉररुमच्या अहवालानुसार, पक्षाला महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशात चमत्काराची आशा आहे. महाराष्ट्रात यंदा पक्षाची कामगिरी चांगली असेल. आपल्याला आणि मित्र पक्षांना सर्वाधिक जागा मिळतील, अशी आशा काँग्रेसला आहे. राज्यात काँग्रेसनं १७ जागा लढवल्या आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ १ जागा जिंकता आली होती. चंद्रपूरची एकमेव जागा काँग्रेसच्या पारड्यात पडली होती.
उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची युती आहे. संविधानाच्या मुद्द्याचा राज्यात लाभ होईल अशी आशा पक्षाला वाटते. त्यामुळे पहिल्यांदाच मायावतींच्या मतपेढीला खिंडार पाडण्यात यश येईल, असा विश्वास काँग्रेसला आहे. बिहारमध्ये लालू यादव यांच्या पाठिंब्यानं भाजप आणि जदयुच्या जागा कमी करण्यात यश येईल, असं काँग्रेसला वाटतं.
दुसरीकडे भाजपची धाकधूक वाढली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये नुकसान होईल असा अंदाज आहे. दोन राज्यांत बसणारा फटका पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तेलंगणात भरुन निघेल, असा भाजपचा दावा आहे. गेल्या निवडणुकीत भाजपनं महाराष्ट्रात ४८ पैकी २३, पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी १८, कर्नाटकात २८ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या.
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं उत्तर प्रदेशा ८० पैकी ६२ जिंकल्या होत्या. तर बिहारमधील ४० पैकी ४० जागा भाजप आणि मित्रपक्षांनी मिळवल्या होत्या. पैकी १७ जागा भाजपनं जिंकल्या होत्या. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये लोकसभेच्या १२० जागा आहेत. त्यामुळे या राज्यांवर भाजपचं केंद्रातील राजकारण अवलंबून असेल. इथे भाजपला फटका बसल्यास त्यांना दिल्लीत धक्का जाणवू शकतो.