लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामाचा आनंद घेण्यासाठी काँग्रेसकडून स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी विशाल पाटील यांना देखील बोलण्यात आलं होतं. सांगलीत महाविकास आघाडीतर्फे ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली असताना, विशाल पाटलांनी बंडखोरी केली.
महाविकास आघाडीतील सांगली लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस असल्याचे निवडणुकी दरम्यान काँग्रेसकडून वारंवार सांगण्यात आलं होतं, मग असं असलं तर श्रमपरिहाराच्या स्नेह भोजनाला चंद्रहार पाटलांच्या ऐवजी विशाल पाटलांची प्रमुख उपस्थिती कशी? अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
ठाकरे गटाचं म्हणणं काय?
सांगलीमध्ये काँग्रेसने पहिल्या दिवसापासून गद्दारी सुरू केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला आम्हाला मदत करण्याची भूमिका घेतली. परंतु शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस देखील विशाल पाटील यांच्यासोबत गेली. काँग्रेसचं स्नेहभोजन म्हणजे अधिकृत गद्दारी केलेल्याचा पुरावाच आहे. त्यामुळे काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केली आहे.
काँग्रेसने विशाल पाटील यांची हकालपट्टी केली नाही म्हणजेच गल्लीपासून दिल्लीपर्यंतची काँग्रेस विशाल पाटील यांच्या पाठीशी होती. सांगलीमध्ये महाविकास आघाडी टिकवायची असेल तर विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांची तातडीने काँग्रेसने हकालपट्टी करावी. अन्यथा सांगलीत महाविकास आघाडी राहणार नाही, असा इशारा विभुतेंनी दिला.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना विधानसभेचे तोंड बघू देणार नाही अशी शपथ आमच्या शिवसेनेने घेतलेली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भांडण संपलं पाहिजे. परंतु ते शेवटपर्यंत जिवंत ठेवण्याचे काम काँग्रेसने केलं. काँग्रेसने आता सांगलीत शिवसेनेकडून मदतीची अपेक्षा ठेवू नये. आमची लायकी निवडून येण्याची नसली तरी तुम्हाला पाडण्याची नक्कीच असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी सांगितले.