नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण होतं की नाही, असा संभ्रम अनेकांच्या मनात होता. मात्र आमंत्रणच मिळालं नसल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे. सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्याने पक्षातील नेते-पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आणि दोन दिवसात होणाऱ्या मनसेच्या बैठकीत यावरुन नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता आहे.
खरं तर मनसे ही अधिकृतरित्या एनडीएचा भाग नाही, पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला. इतकंच नाही, तर ठाणे, पुणे, कल्याण आणि रत्नागिरी या मतदारसंघात राज ठाकरे यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. या चारही मतदारसंघातील उमेदवार निवडून आल्याने मनसेने आपला स्ट्राईक रेट १०० टक्के असल्याचंही म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत घेतलेल्या सभेसाठी राज ठाकरेंनी शिवाजी पार्कचं मैदान बूक केलं होतं.
महत्त्वाचं म्हणजे, नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेवरील कोकण पदवीधर मतदारसंघात राज ठाकरे यांनी अभिजित पानसे यांना मैदानात उतरवलं होतं. परंतु भाजपच्या आग्रहानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यांच्यावर यूटर्नचा ठपका पुन्हा लागला. या सगळ्या वातावरणात सन्मान होत नसल्याची भावना बळावली.
मोदींच्या शपथविधीचं निमंत्रण गेलं नव्हतं, म्हणून मनसेत प्रचंड नाराजी आहे. गरज सरो अन् वैद्य मरो अशी भावना नेते-पदाधिकाऱ्यांत बळावली आहे. कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन काम केलं असल्याने त्यांच्यामध्ये नाराजी आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
दरम्यान, १३ तारखेला मनसेची महत्त्वाची बैठक होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे. यात नेते पदाधिकारी काय भूमिका घेतता, काही वेगळा निर्णय घेतात का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.