उत्तर पश्चिम मतदारसंघातून गजानन कीर्तिकर यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह शिवसेनेने सुरुवातीला धरला होता. मात्र, कीर्तिकर यांनी ऐनवेळी नकार दिला. त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी देण्यात आल्याने गजानन कीर्तिकर यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी आणि अमोल यांच्या मातोश्रीने आपण अमोल यांनाच मतदान केल्याचे जाहीरपणे सांगितले.
‘अमोल हा शिवसेनेचा निष्ठावंत असून, त्यामुळेच तो शिंदे गटात आला नाही. त्याच्या आयुष्याच्या वळणावर मी त्याच्यासोबत नव्हतो, याची आपल्याला खंत आहे,’ असे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले होते. त्यावर भाजपने कीर्तिकरांवर जोरदार आक्षेप घेतला. गजानन कीर्तिकरांनी महायुतीचा धर्म पाळला नाही, असा आरोप भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला. महायुतीच्या उमेदवाराला हरविण्यासाठी कीर्तिकर यांनी पूर्वनियोजित कट केल्याचा आरोपही त्यांनी केला.
आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा गजानन कीर्तिकर यांनी केला. ‘मी कोल्हापूर, नाशिकला प्रचाराला गेलो. आमच्या उमेदवारांसाठी सर्व काही केले. एकनाथ शिंदे एक उद्दिष्ट घेऊन आलेले आहेत. त्यांना मी शेवटपर्यंत साथ देईन,’ असेही त्यांनी म्हटले होते.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कीर्तिकर यांच्यावर काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागलेले असताना आता त्यांच्याकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ‘कीर्तिकर यांच्यावरील कारवाईचा निर्णय २-३ दिवसांत होईल, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली.