नेमकं प्रकरण काय?
खेडकर कुटुंबियांचे पाय आणखी खोलात जात आहेत. पुणे महापालिकेने खेडकर कुटुंबियांना नोटीस बजावली आहे. घरासमोरील अतिक्रमण काढण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे. यासाठी खेडकर कुटुंबियांना पालिकेकडून ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे नोटीस बजावली असल्याचे समोर आले आहे. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे असलेल्या बाणेर येथील नॅशनल हाऊसिंग सोसायटी या निवासस्थानाबाहेरील पदपथावरील बांधकाम काढून घेण्याचे महापालिकेने आदेश दिले आहेत. ७ दिवसाच्या आत स्वखर्चाने केलेले बांधकाम न काढल्यास पालिकेकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. खेडकर यांच्या नॅशनल हाऊसिंग सोसायटी या बंगल्याबाहेर पदपथावर झाडे लावलेले आहेत. ही झाडे काढण्यासाठी नोटीस बजावली आहे. पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानावर बेकायदेशीर अतिक्रमणाची नोटीस लावली.
शारीरिक अपंगत्व श्रेणी आणि ओबीसी कोट्यातील लाभांमध्ये कथित फेरफार केल्याबद्दल अधिकाराचा गैरवापर आणि छाननी केल्याच्या आरोपांबद्दल त्यांच्या विरुद्ध चौकशी सुरु आहे. यावेळी हे प्रकरणही समोर आले आहे. पीएमसीच्या अतिक्रमण विभागाच्या म्हणण्यानुसार, खेडकर यांच्या निवासस्थानी महापालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक रस्ते किंवा फूटपाथवर अनधिकृत बांधकाम किंवा अडथळे आढळले आहे. पीएमसी अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या नोटीसमध्ये खेडकर यांच्या निवासस्थानाचा काही भाग आवश्यक परवानगीशिवाय बांधण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. शहरातील बेकायदा बांधकामांविरोधात पीएमसी कठोर भूमिका घेत आहे आणि हे प्रकरण अतिक्रमणांवर व्यापक कारवाईचा एक भाग आहे.