निधी वाटपावरून पुणे जिल्हा नियोजन बैठकीत सुप्रिया सुळे आणि आमदार सुनील शेळके यांच्यात खडाजंगी झाली आहे. आम्हाला न्याय मिळणार का? का फक्त मावळला निधी मिळणार, असा सवाल सुप्रिया सुळेंनी बैठकीत विचारला. त्यावर सुनील शेळकेंचा संताप झाल्याचे दिसून आले आहे. यावर सुळेंना प्रत्युत्तर देत शेळके म्हणाले, ताई आम्ही बारामती बारामती करत नाहीत, तुम्ही सारखं मावळचा उल्लेख करत आहात, असं ते म्हणाले. यावर पलटवार करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्ही काय फक्त बैठकीला यायचं का? असा सवाल विचारण्यात आला. यामुळे पवारांसमोरच वातावरण तापल्याचे चित्र निर्माण झालं होतं.
सुप्रिया सुळे आणि सुनील शेळके यांच्यात वाद झाला. हा वाद लक्षात घेत अजित पवार यांनी यात हस्तक्षेप केला. तसेच निधी देण्याबाबत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करु असे ते म्हणाले. तसेच चर्चा करुन निधी नक्कीच दिला जाईल, असं आश्वासनही यावेळी अजित पवारांनी दिलं आहे. यानंतर हा वाद थांबल्याचे पहायला मिळाले. तसेच यानंतर दुसऱ्या प्रश्नावर चर्चा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान पुणे जिल्हा नियोजन बैठकीसाठी शरद पवार आणि अजित पवारांनीही हजेरी लावली होती. यावेळी रविंद्र धंगेकर, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे हे देखील उपस्थित होते. या बैठकीत पाणी प्रश्नावर सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना घेरलं होतं. यावेळी अजित पवारांनी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत तुम्हाला बैठकीत बोलण्याचा अधिकार नाही म्हणत प्रश्नाला उत्तर देणं टाळलं आहे.