प्रतिनिधी, मुंबई : मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा देणाऱ्या मुंबई सागरी किनारा मार्गाचे काम पूर्ण होण्यास अजून काही महिने वाट पाहावी लागणार आहे. मात्र या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ आज, सोमवारी १० जून रोजी करण्यात येणार आहे. त्यानंतर मंगळवार, ११ जूनपासून हा दुसरा टप्पा, म्हणजेच मरिन ड्राइव्हपासून हाजीअली, लोटसपर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. हाजीअली पासून मरिन ड्राइव्हपर्यंत जाण्यासाठीचा मार्ग याआधीच खुला करण्यात आला आहे. उद्यापासून दोन्ही बाजूंनी हा मार्ग सुरू होत असल्याने दक्षिण मुंबईत ये-जा करणाऱ्यांच्या वेळेत बचत होणार आहे.लोकसभा निवडणुकीपूर्वी सागरी किनारा मार्गाच्या हाजीअली ते मरिन ड्राइव्ह या मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर, काही दिवसांपूर्वी या मार्गिकेवरील बोगद्यामध्ये गळती लागल्याची बाब समोर आली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मार्गाची पाहणी करून सागरी किनारा मार्गाला कोणताच धोका नसल्याचे स्प्ष्ट केले होते. त्यावेळी दुसऱ्या टप्प्याचाही लवकरच शुभारंभ करण्यात येईल, असे सूतोवाच त्यांनी केले होते. त्यानुसार मरिन ड्राइव्हपासून अमरसन्स गार्डन, हाजीअली जंक्शन, लोटस जंक्शनपर्यंतच्या मार्गिकेचा प्रारंभ आज, सोमवारी करण्यात येणार आहे. ११ जूनपासून किनारा मार्गाची ही उत्तर वाहिनी सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री ११ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे. शनिवार आणि रविवारी हा मार्ग पूर्णपणे बंद असेल, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
– उद्या, मंगळवारपासून वाहनांना परवानगीअशी असेल वेगमर्यादा
यांना प्रवेशबंदी
– उद्या, मंगळवारपासून वाहनांना परवानगी
– दोन्ही बाजूंनी मार्ग सुरू होणार; दक्षिण मुंबईतील ये-जा होणार वेगवान
– सोमवार ते शुक्रवार स. ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी मार्ग खुला
– शनिवार आणि रविवारी किनारा मार्ग पूर्णपणे बंद राहणार
अशी असेल वेगमर्यादा
ठिकाण वेगमर्यादा (ताशी)
सरळ मार्गावर ८० कि. मी.
बोगद्यामध्ये ६० कि. मी.
वळण मार्गावर ४० कि. मी
यांना प्रवेशबंदी
– सर्व प्रकारची अवजड वाहने, ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर, मालवाहू वाहने
– दुचाकी वाहने, सायकल, अपंगांची दुचाकी
– सर्व प्रकारची तीन चाकी वाहने
– पादचारी