कोण लागतो तुमचा? होर्डिंग दुर्घटनेवरुन राम कदमांचा ठाकरेंना सवाल; भुजबळांकडून मोलाचा सल्ला

मुंबई: सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काल मुंबईकरांची दाणादाण उडाली. पूर्व उपनगरातील घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपवर कोसळलं. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक जण जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्दैवी घटनेवरुन आता राजकारण सुरु झालं आहे.

महाकाय होर्डिंग लावणाऱ्या जाहिरात एजन्सीचा मालक भावेश भिंडेचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. कोसळलेलं बॅनर अवैध असल्याची, ते पालिकेच्या परवानगीशिवाय लावण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. भावेश भिंडे सध्या फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. त्याचा मोबाईल स्विच्ड ऑफ आहे. बेपत्ता भिंडेच्या शोधाचे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहेत.
अनेकजण अडकले, काही सैरावैरा पळाले; होर्डिंग पडल्यानंतर हाहा:कार, बिझनेसमननं सांगितला थरार
भावेश भिंडेचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो भाजपचे आमदार राम कदम यांनी एक्सवर पोस्ट केला आहे. ‘१४ लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे. श्रीमान उद्धव ठाकरे यांच्या घरात. मनाला चीड आणणारे हे चित्र. त्या अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते? हे या चित्रावरून स्पष्ट होते. टक्केवारी साठी कोविड काळातले खिचडी चोर, कफनचोर. आजही टक्केवारीसाठी १४ लोकांचे नाहक बळी घेत आहेत. कुठे फेडणार हे पाप?’, असा सवाल राम कदमांनी विचारला आहे.
‘त्या’ होर्डिंगची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, झाडांवर विषप्रयोग; धक्कादायक माहिती समोर
‘काय पराक्रम केलाय भावेश भिंडेंनी? कोण लागतो हा तुमचा? काय संबंध आहेत याचे आणि उबाठाचे? आम्हाला आरोप-प्रत्यारोप करायचे नाहीत. पण राजकीय संरक्षण असल्याशिवाय, तेही मुंबई शहरात, असं तीन मजली अनधिकृत होर्डिंग कोणी उभारु शकतं का? शक्यच नाही. या घटनेला उबाठाही तेवढाच जबाबदार असल्याचं सामान्य जनता म्हणत असेल तर यात चुकीचं काय?,’ असे प्रश्न कदम यांनी उपस्थित केले आहेत.

घाटकोपरमधील घटना आणि राम कदम यांनी त्यावरुन ठाकरेंवर केलेली टीका यावर भुजबळांनी भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंचा काय संबंध?, असा उलटप्रश्न भुजबळांनी विचारला. ‘असे व्यापारी, धंदेवाईक लोक आमच्याकडेसुद्धा पुष्पगुच्छ घेऊन, नाहीतर मिठाई घेऊन येत असतात. ते फोटोही काढतात. माझ्याकडे तर कोणीही येतं आणि फोटो काढतं. मी नाही म्हणून शकत नाही ना? तो कोण आहे, काय आहे, आपला कार्यकर्ता आहे की नाही हेदेखील अनेकदा माहीत नसतं. अशा लोकांचे फोटो सगळ्यांसोबत असतात. त्याच्यावरुन काही अर्थ काढणं योग्य असल्याचं मला वाटत नाही. आपण त्यात राजकारण आणण्याचा प्रयत्न करु नये आणि तो कोणीही असेल, कितीही मोठा असेल तरीही त्याला शिक्षा झाली पाहिजे, अशू भूमिका भुजबळांनी मांडली.