कोण असली? कोण नकली? ‘निक्काल’ लागला; शिंदेसेना, ठाकरेसेना भिडलेल्या १३ जागांवर काय घडलं?

मुंबई: शिवसेना फुटीनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत दोन्ही शिवसेना १३ जागांवर आमनेसामने होत्या. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामन्यात विरोधकांच्या आघाडीनं लक्षणीय यश मिळवलं आहे. महाविकास आघाडीनं ३० जागा खिशात घातल्या आहेत. तर महायुतीला केवळ १७ जागांवर यश मिळालं आहे. भाजपच्या जागा २३ वरुन थेट ९ वर आल्या आहेत.

महायुतीत शिंदेसेनेला १५ जागा मिळाल्या. यातील १३ जागांवर त्यांचा सामना ठाकरेसेनेशी झाला. या सगळ्याच जागांवर घासून सामना झाला. १३ पैकी ६ जागांवर शिंदेसेनेनं यश मिळवलं आहे. बुलढाणा, कल्याण, मावळ, हातकणंगले, संभाजीनगर, ठाण्यात शिंदेसेनेनं यश मिळवलं आहे. बुलढाणा, कल्याण, मावळ, हातकणंगलेत शिंदेंनी त्यांच्या विद्यमान खासदारांनी तिकिटं दिली. त्यांनी आपापल्या जागा राखल्या. शिंदेंच्या शिलेदारांनी ठाणे, संभाजीनगरात बाजी मारली. इथे ठाकरेसेनेचा पराभव झाला.
Lok Sabha Election Result 2024: अब की बार महत्प्रयासानं नय्या पार; भाजपची आता N फॅक्टरवर मदार; ‘ते’ दोघे काय करणार?
शिंदेसेनेचं आव्हान असलेल्या १३ पैकी ६ मतदारसंघांमध्ये ठाकरेसेनेनं बाजी मारली. यवतमाळ, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, हिंगोली, शिर्डी, नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिलेदारांनी विजय मिळवला. पैकी दक्षिण मध्य मुंबई, हिंगोली, शिर्डी, नाशकात ठाकरेंच्या उमेदवारांनी शिंदेंच्या खासदारांचा पराभव केला. १३ पैकी ६ जागा शिंदेसेनेनं जिंकल्या आहेत, तर ६ जागा ठाकरेसेनेनं जिंकल्या आहेत.

वायव्य मुंबईत शिंदेसेनेचे रविंद्र वायकर विरुद्ध शिवसेना उबाठाचे अमोल कीर्तीकर यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. आधी कीर्तीकरांना विजयी घोषित करण्यात आलं होतं. पण वायकरांनी फेरमतमोजणीची मागणी केली. त्यानंतर वायकरांना विजयी घोषित करण्यात आलं. पण मग कीर्तीकरांनी फेरमोजणीची मागणी केली. आता तिथे पुन्हा मतमोजणी होतेय.