कुलाबा येथे बुधवारी ३७.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा ४ अंशांनी अधिक होते, तर मंगळवारपेक्षा १.४ अंशांनी अधिक होते. सांताक्रूझ येथे ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा ३.७ अंशांनी अधिक होते. बुधवारी कोकण विभागात अलिबाग, रत्नागिरी, डहाणू या केंद्रांवरही पारा चढा होता. अलिबाग येथेही ३७.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा ४.५ अंशांनी अधिक होते. भारतीय हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार कोकणात सर्वच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट स्थानिकांनी अनुभवली.
कुलाबा येथे गेल्या १० वर्षांमधील मे महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमान बुधवारी नोंदवले गेले. गेल्या १० वर्षांमध्ये २०१५मध्ये कमाल तापमान ३६.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते, तर इतर वर्षी मे महिन्यात सर्वाधिक कमाल तापमान ३५ ते ३६ अंशांदरम्यान नोंदवले गेले. सांताक्रूझ येथे बुधवारचे कमाल तापमान हे गेल्या १० वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाचे तापमान होते. २०२१ मध्ये कमाल तापमानाचा पारा ३७.४ अंश नोंदवला गेला होता. गेल्या १० वर्षांत मे महिन्यामध्ये केवळ २०२१ मध्येच एकदा सांताक्रूझ येथील कमाल तापमान ३७ पार पोहोचले होते.
उष्णतेची लाट अन् पावसाचाही अंदाज
कोकण विभागात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, उर्वरित महाराष्ट्रात रत्नागिरी, सिंधुदुर्गासह, धुळे, जळगाव, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ येथे मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक आणि अहिल्यादेवी नगरला गुरुवारसाठी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. या काळात मेघगर्जनेसह ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. तसेच गाराही पडू शकतात अशी शक्यता आहे.