कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री हा प्रवास भाजपमध्येच शक्य, अहोरात्र काम करेन, मोहोळांचं आश्वासन

प्रतिनिधी, पुणे: पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी रात्री केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मोहोळ यांच्या रूपात तब्बल चाळीस वर्षांनंतर माजी केंद्रीय मंत्री विठ्ठलराव गाडगीळ यांच्यानंतर पुण्याच्या लोकसभेच्या खासदाराला केंद्रात मंत्रिपद मिळाले आहे. यापूर्वी मंत्री असलेले प्रकाश जावडेकर, सुरेश कलमाडी राज्यसभेतील खासदार होते.

मोहोळ यांना केंद्रात सांस्कृतिक आणि पर्यटन, क्रीडा किंवा नगरविकास विभागापैकी एका विभागाचा पदभार मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मोहोळ यंदा पहिल्यांदाच खासदार झाले असून, पश्चिम महाराष्ट्रातील युवा मराठा नेता म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, मोहोळ यांच्या रूपात मुळशी तालुक्याला पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोहोळ यांनी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा सव्वा लाख मतांनी पराभव केला. या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातून पुणे आणि सातारा या दोनच मतदारसंघांत भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे मोहोळ यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशी अटकळ बांधली जात होती. रविवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मोहोळ यांना दूरध्वनी करून मंत्रिपदी संधी दिली जात असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मोहोळ हे संभाव्य मंत्र्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात बोलावलेल्या बैठकीस उपस्थित होते.

लोकसभेचे खासदार ते मंत्री

पुण्याचे लोकसभेचे खासदार असलेले काकासाहेब गाडगीळ हे १९५२ मध्ये केंद्रात मंत्री होते. त्यांच्यानंतर मोहन धारिया यांची १९७७ साली केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. त्यानंतर १९८४ ला विठ्ठलराव गाडगीळ हे मंत्री झाले होते. विठ्ठलराव गाडगीळ यांच्यानंतर पुण्यातून सुरेश कलमाडी आणि प्रकाश जावडेकर यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली असली तरी ते राज्यसभेवर निवडून गेलेले होते. गाडगीळ यांच्यानंतर तब्बल ४० वर्षांनंतर मोहोळ हे केंद्रीय मंत्री झाले आहेत.

केंद्रीय मंत्री हा प्रवास भाजपमध्येच होऊ शकतो – मुरलीधर मोहोळ

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना त्यांच्या मंत्रिमंडळात माझी निवड झाली, याचा खूप आनंद आणि समाधान आहे. त्याचबरोबर जबाबदारी आणि कर्तव्यपूर्तीची जाणीवही मनात आहे. वॉर्डस्तरावरील कार्यकर्ता ते केंद्रीय मंत्री हा प्रवास भाजपमध्येच होऊ शकतो. त्यासाठी मी पक्षनेतृत्वाचा आभारी आहे. खासदार म्हणून पुणेकर आणि मंत्री म्हणून देशसेवेची संधी मला मिळाली आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेले २०४७ मधील विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मी अहोरात्र काम करीन, असं नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले.