यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशिक्षणाच्या काळातच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अवाजवी मागण्या केल्यामुळे आणि बेशिस्त वर्तनामुळे पूजा खेडकर यांची सध्या देशात चर्चा होत आहे. लाल बहादूर शास्त्री अकादमीसहित अगदी पंतप्रधान कार्यालयाने देखील त्यांची दखल घेतली आहे. पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी मालकीच्या ऑडी गाडीवर लाल पिवळा अंबर दिवा लावल्याने त्यांच्या गाडीवर कारवाई करण्यासाठी पुणे पोलीस गेले होते.
यावेळी पुजाची आई मनोरमा खेडकर यांनी पोलिसांशी वाद घातला. गेटवर आलेल्या पोलिसांना काही वेळ त्यांनी गेटच्या आत घेतलेच नाही. गेट उघडा, असे पोलीस पूजाच्या आईला सांगत होते. मात्र बळजबरीने आतमध्ये यायचा प्रयत्न केला तर तुम्हाला सगळ्यांना तुरुंगात टाकेन, अशा शब्दात त्यांनी पोलिसांना दमदाटी केली.
पूजा खेडकरची प्रतिक्रिया काय?
तुमच्या गाडीवर कारवाई करण्यासाठी पोलीस गेलेले आहेत, असे विचारला असता पूजा खेडकर म्हणाल्या, “याविषयी मी काहीही बोलू शकत नाही किंबहुना मला तशी परवानगी नाही. याविषयी कृपया आपण मला प्रश्न विचारू नयेत. मी सध्या वाशिमध्ये आहे, मला माझे काम करू द्यावे”
वाशिमध्ये जाऊन पूजा खेडकर यांची कामाला सुरुवात
पूजा खेडकर यांचे पुण्यात ‘कार’नामे समोर आल्यानंतर त्यांची बदली वाशिम जिल्ह्यात करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पूजा खेडकर यांनी त्यांचे काम सुरू केले आहे, अशी माहिती वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी. एस यांनी दिली.
ओबीसी आरक्षणाचा लाभ, खोट्या अपंग कागदपत्रांच्या आधारे आयएएस झाल्याचा ठपका तसेच प्रोबेशनरी अधिकारी असताना केलेल्या अवास्तव मागण्या यामुळे पूजा खेडकर सध्या देशात चर्चेत आहेत.