वर्षाताईंचा प्रचार करायचा की नाही याचा निर्णय घेणार!
सलग चार वेळा आमदार राहिलेला मी काँग्रेस पक्षाचा वरिष्ठ नेता आहे. पक्षानेच मला उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून लढण्याची सूचना केली होती. पक्षाचा आदेश मानणारा मी कार्यकर्ता असल्याने त्यासंदर्भात मी तयारी देखील केली होती. परंतु असे असताना पक्षाने गुरूवारी रात्री मला संधी न देता वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मी निश्चितच नाराज आहे. मुस्लीम समाजाची मते घ्यायची मात्र त्यांना प्रतिनिधित्व द्यायचे नाही, असे पक्षाचे धोरण आहे काय? असा प्रश्न मला राज्यातील मुस्लीम समाज विचारतो आहे. त्यांच्या प्रश्नाचे मी काय उत्तर देऊ? असा सवाल विचारत ‘उत्तर मध्य’मध्ये प्रचार करायचा की नाही? याचा निर्णय घेऊ, असे नसीम खान म्हणाले.
नसीम खान यांचे पक्षश्रेष्ठींना सणसणीत पत्र
कॉँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून प्रतिकूल परिस्थितीतही पक्षाने दिलेल्या सर्व आदेशाचे पालन मी करत आलो आहे. पक्षाने मला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तेलंगाणा, गोवा आणि महाराष्ट्र येथे पक्षाचा प्रचार-प्रसार करण्याची जी-जी जबाबदारी दिली होती ती पण मी पूर्ण इमानदारीने पाड पडली. परंतु या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसने ४८ जागांपैकी एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नसल्याने प्रचारादरम्यान अल्पसंख्याक समाज मला प्रश्न विचारतो आहे. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास माझ्याकडे शब्द नसल्याने मी प्रचारात भाग घेऊ इच्छित नाही, अशा भावना नसीम खान यांनी पक्षश्रेष्ठींना लिहिलेल्या पत्रात नमूद केल्या आहेत.