काँग्रेसच्या सर्व नवनियुक्त खासदारांसह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेत्यांचा सत्कार सोहळा शुक्रवारी दादर येथील प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात पार पडला. त्यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नितला यांच्यासह नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुनील केदार यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. त्यासह काँग्रेसच्या नव्या खासदारांची एक बैठकही यावेळी पार पडली. यावेळी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रमेश चेन्नितला यांनी विधानसना निवडणुकीपर्यंत प्रभारी पदी कायम रहावे, असे साकडेही घातले. वडेट्टीवार यांच्यासह अनेक नेत्यांनी या मागणीला पाठिंबा दर्शविला.
खासदारांच्या या बैठकीत मार्गदर्शन करताना रमेश चेन्नितला म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन काम केले, जिल्हा, ब्लॉक स्तरावर संघटनेला चालना दिली. उमेदवारी देतानाही सर्वांना विचारातून घेऊन निर्णय घेतला आणि सर्वांच्या एकजुटीने काँग्रेस पक्षाने १७ जागा लढवून १४ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. हे यश कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे आहे, एकजुटीची ही वज्रमुठ अशीच कायम ठेवणे गरजेचे आहे. लोकसभेची लढाई आपण जिंकली आहे आता विधानसभा हे आपले लक्ष्य असून असाच लढा देऊ व विधानसभेत महाविकास आघाडीचे सरकार आणू, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.
प्रदेशाध्यक्षांसह इतर नेत्यांना कानपिचक्या
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस महाराष्ट्रात मोठा भाऊ असल्याचा दावा केला होता. त्यासंदर्भात बोलताना रमेश चेन्नितला यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले. विधानसभा निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्रितरित्या काम करण्याची सूचना रमेश चेन्नितला यांनी यावेळी दिली.
चेन्नितला यांनी घेतली ठाकरे – पवारांची भेट
लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या यशानंतर काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नितला यांनी शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटी दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या कामगिरीबाबत आणि महाविकास आघाडीच्या आगामी रणनितीबाबत साधक बाधक चर्चा करण्यात आल्याचे कळते. या भेटीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, सुनील केदार, माजी मंत्री अस्लम शेख यांच्यासह इतर प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते.