काँग्रेसचा नेता फोडून जागा लढवली, पण बद्रीनाथमध्ये कार्यक्रम झाला

विशाल बडे, मुंबई : भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला, पोटनिवडणूक झाली, पण मतदारांनी असा धडा शिकवला ज्यामुळे काँग्रेस सोडल्याचा पश्चात्ताप करण्याची वेळ उत्तराखंडमधील नेत्यावर आली आहे. ऐनवेळी पक्ष सोडल्यानंतर नेता तर गेला, पण कार्यकर्ते काँग्रेसमध्येच राहिले आणि अशा मतदारसंघात भाजपवर पराभवाची वेळ आली, ज्याची ओळख देशभरात आहे.

ज्या अयोध्येतल्या पराभवाची चर्चा देशाच्या संसदेपर्यंत झाली, भाजपला डिवचण्यासाठी अयोध्येत निवडून आलेल्या खासदाराला अखिलेश यादव यांनी लोकसभेत पहिल्या बाकावर जागा दिली, राममंदिर बांधल्यानंतरही अयोध्येत पराभव झाल्यावरुन काँग्रेसनेही वारंवार डिवचलं, हे सगळं ताजं असतानाच उत्तराखंडच्या बद्रीनाथमध्ये भाजपच्या जिव्हारी लागणारा पराभव झाला आहे. महाराष्ट्रातल्या नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना घेतल्यानंतर जे झालं त्याचीच पुनरावृत्ती उत्तराखंडच्या बद्रीनाथ मतदारसंघात घडली आणि त्यामुळे काँग्रेसमधून आयात केलेला उमेदवारही पडला. अयोध्येनंतर बद्रीनाथमध्येही भाजपचा कार्यक्रम कसा झाला, या मतदारसंघातल्या पराभवावरुन भाजपला का ट्रोल केलं जातंय…बद्रीनाथ, हिंदू धर्माचं तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या या शहरात भाजपच्या पराभवाचीच चर्चा आहे.
Pooja Khedkar : आता मॉक इंटरव्यू व्हायरल, पूजा खेडकरने ओबीसी आरक्षणाचाही लाभ घेतला?

बद्रीनाथमध्ये नेमकं काय घडलं?

२०१७ ला भाजपच्या महेंद्र भट्ट यांनी हा मतदारसंघ जिंकला होता. २०२२ च्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत बद्रीनाथ मतदारसंघ काँग्रेसने जिंकला. काँग्रेसच्या राजेंद्र भंडारी यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र राजेंद्र भंडारी यांनी काही दिवसातच भाजपात प्रवेश केला आणि आमदारकीचा राजीनामा दिला. पोटनिवडणूक लागल्यानंतर भाजपकडून राजेंद्र भंडारी यांनाच पुन्हा तिकीट मिळालं.

पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नवख्या उमेदवाराकडून पाच हजार मतांनी भंडारींचा पराभव झाला. राजेंद्र भंडारी भाजपात गेले, पण कार्यकर्ते काँग्रेसमध्येच थांबल्याची माहिती आहे. याशिवाय भंडारी यांच्या पत्नीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तसंच लोकांमध्ये रोषही वाढला. मतदारांनी निवडणुकीत राग काढला आणि काँग्रेसच्या नवख्या उमेदवाराला २७ हजार मतं मिळाली.
Anshuman Singh : ‘माझं मरण चारचौघांसारखं नसेल…’ वीरपत्नीने जागवल्या हुतात्मा अधिकाऱ्याच्या आठवणी

भाजपचा दारुण पराभव झाला

खरं तर बद्रीनाथ हा मतदारसंघ भाजपकडे नव्हताच, पण काँग्रेसचा विजयी झालेला आमदारच आपल्याकडे आलेला असल्यामुळे भाजपला विजयाची खात्री होती. पण झालं उलटंच. भाजपने काँग्रेसमधून या नेत्याला आयात केलं खरं, पण यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्ता दुखावला गेला आणि निवडणुकीत याचा परिणाम दिसला. याउलट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अधिक आक्रमकतेने निवडणुकीत काम केलं आणि पक्ष सोडून गेलेल्या नेत्याला पाणी पाजलं. अयोध्येत झालेल्या पराभवावरुन भाजपला अजूनही ट्रोल केलं जात होतं, त्यातच बद्रीनाथमधल्या लढतीवरुन पुन्हा एकदा ट्रोल केलं जात आहे.

अयोध्येत नेमकं काय झालं?

– अयोध्येचा समावेश असलेल्या यूपीतील फैजाबाद मतदारसंघातून समाजवादी पक्षाचा विजय
– फैजाबादमध्ये सपाच्या उमेदवाराने साडे पाच लाखांच्याही वर मते मिळवली, ५४ हजारांनी विजयी
– अयोध्येत पराभव झाल्यामुळे काँग्रेस आणि सपाने भाजपला संसदेतही डिवचलं
– अखिलेश यादव यांनी विजयी उमेदवाराला पहिल्या रांगेत आणून बसवलं

अयोध्येतल्या पराभवावरुन भाजपला प्रचंड ट्रोल केलं गेलं. त्यातच बद्रीनाथचा निकाल हा विरोधकांना ट्रोल करण्यासाठी आयतं कारण देणारा ठरतो आहे. कारण, सात राज्यातील विविध जागांवर इंडिया आघाडीने बाजी मारलेली असली तरी चर्चा मात्र उत्तराखंडमधील फक्त एका जागेची आहे.