कणीक मळताना यंत्रात अडकून मनगट तुटलं, निर्णायक सहा तास उलटले, ससूनच्या डॉक्टरांनी करुन दाखवलं

प्रतिनिधी, पुणे : कणीक मळण्याचे काम करत असताना बारामती येथील एका २२ वर्षीय तरुणाचा हात यंत्रामध्ये अडकला आणि अवघ्या काही क्षणातच मनगटापासून वेगळा होऊन जमिनीवर पडला. हा भयानक प्रकार पाहून या तरुणाच्या कुटुंबीयांचे सारे अवसान गळाले. मात्र, ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या सात तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे मनगटापासून वेगळा झालेला हात पुन्हा जोडण्यात यश आले.

शस्त्रक्रियेच्या पंधरा दिवसानंतर आता या तरुणाचा हात योग्यरित्या शरीराशी जोडला गेला असून हाताचे कार्य वाढावे यासाठी पुढील उपचार करण्यात येणार आहे. या तरुणाचा हात तुटल्याची माहिती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने या तरुणाला बारामतीहून पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्याची सूचना केली.

हात तुटल्यानंतर सहा तासांमध्ये पुन्हा जोडणे आवश्यक होते. मात्र, या तरुणाला ससूनमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा हात तुटून सहा तास उलटले होते. त्यामुळे पुनर्रोपण शस्त्रक्रिया करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. तरुणाला आणि त्याच्या नातेवाइकांना शस्त्रक्रियेतील धोके समजावून सांगण्यात आले. नातेवाईकांच्या परवानगीनंतर डॉक्टरांनी पुनर्रोपण शस्त्रक्रिया केली. ससून रुग्णालयातील प्लॅस्टिक सर्जरी शस्त्रक्रिया विभागात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
Yogesh Kadam : शिवसैनिकांना घड्याळाला मत द्यायचं नाही, दापोलीतील गितेंच्या लीडचं योगेश कदमांकडून स्पष्टीकरण
प्लॅस्टिक सर्जरी विभागातील डॉ. अंकुर कारंजकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही शस्त्रक्रिया केली. डॉ. पीयूष बामनोडकर, डॉ. आदित्य मराठे, डॉ. रणजित पाटील, डॉ. कौशिक दास, डॉ. प्रतीक पाटील आणि डॉ. सुजित क्षीरसागर यांचा समावेश होता. त्यांना डॉ. पराग सहस्रबुद्धे आणि डॉ. निखिल पानसे यांनी मार्गदर्शन केले.

अशी झाली शस्त्रक्रिया

– सुरूवातीला तरुणाचे हात आणि तुटलेल्या भागाची हाडे धातूच्या पट्ट्यांनी जोडली.
– यानंतर धमणी, रक्तवाहिनी, चेतापेशी आणि स्नायू जोडण्यात आले.
– तरुणाला रक्ताच्या चार पिशव्या आणि प्लेटलेटच्या दोन पिशव्या देण्यात आल्या.
– शस्त्रक्रियेनंतर तीन दिवस अतिदक्षता विभागात दाखल ठेवण्यात आले.
– शस्त्रक्रिया सात तास सुरू होती.
Kolhapur : मंडलिकांच्या पराभवाने घाटगे-मुश्रीफ गटात ठिणग्या, कुणाचे बंटी पाटलांवरुन चिमटे, कुणाकडून ‘राजे’ कनेक्शनवर बोटRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

शस्त्रक्रियेतील धोके

– अवयव शरीरापासून जास्त काळ वेगळा राहिल्यास जोडला न जाण्याचा धोका असतो.
– दीर्घ कालावधीनंतर अवयव जोडल्यास रक्तातील मृत पेशींमुळे संसर्ग होण्याची शक्यता असते.
– संसर्गामुळे मूत्रपिंड, यकृत अथवा इतर अवयवांना धोका निर्माण होण्याची शक्यता असते.