ऑफिसला जाते सांगून निघाली, मरिन ड्राइव्ह गाठलं, थोडा वेळ बसली, अंगावरील दागिने काढले अन्…

प्रतिनिधी, मुंबई: अंधेरी येथील एका २६ वर्षीय तरुणीने मरिन ड्राइव्ह येथील समुद्रात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. ममता कदम असे या तरुणीचे नाव असून ती टीसीएस या कंपनीत नोकरीला होती. या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

मरिन ड्राइव्ह समुद्रकिनारी एक तरुणी बुडत असल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला दिली होती. नियंत्रण कक्षातून याबाबत कळताच मरिन ड्राइव्ह पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. ही तरुणी समुद्रात बुडाल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी बुडालेल्या या तरुणीला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत खूप उशिर झालेला, या तरुणीला वाचवता येईल त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या तरुणीची ओळख ममता कदम असल्याचं पटल्यानंतर पोलिसांनी तिच्या आई आणि भावाशी संपर्क साधला आणि त्यांना याबाबतची माहिती दिली.
Police Ends Life: घरातून दुर्गंधी, दरवाजा उघडताच समोर हादरवणारं दृश्य, पोलीस शिपायाचं टोकाचं पाऊल

ऑफीसला जाते सांगून घरुन निघाली अन् थेट मरिन ड्राइव्ह गाठलं

ममता कदम ही कार्यालयात जाते सांगून ती सकाळी घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर चर्चगेट स्थानकावर उतरताच ती थेट मरिन ड्राइव्हच्या दिशेने गेली आणि हॉटेल इंटर कॉन्टिनेन्टल समोर समुद्रकिनारी कठड्यावर जाऊन बसली. काही वेळ मोबाइलवर चॅटिंग केल्यानंतर तिने मोबाइल, लॅपटॉप, अंगावरील दागिने, पर्स हे सारं सॅकमध्ये काढून ठेवत समुद्राच्या पाण्यात स्वत:ला झोकून दिले. त्यात तिचा मृत्यू झाला.

या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, तिचे एका तरुणसोबत लग्न होणार होते, अशी माहिती ममताच्या कुटुंबीयांनी दिली आहे. त्यावरून सद्या पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे. ममताच्या या निर्णयाने तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ऑफीसला जाण्यासाठी निघालेली मुलगी परत कधीच घरी येणार नाही, हे कळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.