‘एमएचटी-सीईटी’च्या निकालात ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल, पुण्यातील तिघं अव्वल

प्रतिनिधी, पुणे : राज्यातील महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘एमएचटी-सीईटी’च्या निकालात ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. यामध्ये ‘पीसीबी’ गटातील १७ विद्यार्थ्यांचा, तर ‘पीसीएम’ गटातील २० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील आदित्य करपे (पीसीबी), सोहम लगड (पीसीबी) आणि अमलेश घाटे (पीसीएम) अशा तिघांना १०० पर्सेंटाइल गुण मिळवले आहे. एकूण निकालात उत्तीर्णांचे प्रमाण ९३.१५ टक्के आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, सीईटी सेलची वेबसाइट हँग झाल्याने, अनेकांना निकालच पाहता आले नाही.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) ‘एमएचटी-सीईटी’ घेण्यात आली. ही प्रवेश परीक्षा २२ एप्रिल ते १६ मे या कालावधीत घेण्यात आली. राज्यभरातील १५९ केंद्रांवर ही परीक्षा झाली. त्यातील १६ परीक्षा केंद्रे राज्याबाहेरील होती. ‘एमएचटी-सीईटी’ या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सात लाख २५ हजार ५२ विद्यार्थ्यांपैकी सहा लाख ७५ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) गटासाठी तीन लाख १४ हजार ६७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होतीस त्यातील दोन लाख ९५ हजार ५७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) गटासाठी नोंदणी केलेल्या चार लाख १० हजार ३७७ विद्यार्थ्यांपैकी तीन लाख ७९ हजार ८०० विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते.
Sunetra Pawar : माझ्या पक्षातील लोकांचा मोठेपणा… केंद्रीय मंत्रिपदाच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचं उत्तर

ओबीसी प्रवर्गातून आठ विद्यार्थी

पीसीएम गटात उत्तीर्णांचे प्रमाण ९३.९३ टक्के, तर पीसीबी गटातील उत्तीर्णांचे प्रमाण ९२.५५ टक्के आहे. परीक्षेतील एकूण उत्तीर्णांचे प्रमाण ९३.१५ टक्के आहे. एकूण निकालात खुल्‍या गटात १८ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल मिळवले असून, ओबीसी प्रवर्गातून आठ विद्यार्थी शंभर पर्सेंटाईल प्राप्‍त केले आहे, अशी माहिती राज्‍य सीईटी सेलद्वारे देण्यात आली.
Ajit Pawar : अजितदादा बाहेर पडले, तरी महायुती मजबूत; आकड्याच्या गणितात राष्ट्रवादीची गरज संपुष्टात?

वैद्यकीय, इंजिनीअरिंग प्रवेशाची संधी

‘सीईटी’च्या निकालात ९९ किंवा १०० पर्सेंटाइल गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना यंदा नीट; तसेच ‘जेईई अॅडव्हान्स्ड’मध्ये चांगले गुण मिळाले आहेत. ‘नीट’मध्ये चांगले गुण मिळालेले विद्यार्थी नामांकित सरकारी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाला, तर ‘जेईई अॅडव्हान्स्ड’मधील गुणवंत आयआयटी, ट्रीपल आयटीमध्ये प्रवेशांना प्राधान्य देणार आहेत. त्यामुळे गुणवंतांना राज्यातील चांगल्या महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय किंवा इंजिनीअरिंग प्रवेशाची संधी असल्याचे चित्र आहे.

प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती लवकरच प्रसिद्ध

‘एमएचटी-सीईटी’चा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी येत्या आठवड्यात राज्‍य सीईटी सेलमार्फत प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आणि महाविद्यालयांची माहिती प्रसिद्ध केले जाण्याची शक्यता आहे. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी, महाविद्यालयांचे पर्य़ाय, गुणवत्ता यादी जाहीर होणे अशा प्रक्रिया करता येणार आहेत. विद्यार्थी आणि पालकांनी अधिक माहितीसाठी सीईटी सेलच्या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन केले आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

निकालानंतर वेबसाइट हँग

सीईटी सेलने नियोजित वेळापत्रकानुसार सायंकाळी सहा वाजता निकाल जाहीर केला. मात्र, एकाच वेळी अनेकांनी निकाल पाहण्यासाठी लॉग-इन केल्याने, वेबसाइट हँग झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता आला नाही. साधारणत: दोन तास सर्व्हर डाऊन असल्‍याने विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी काही तास प्रतीक्षा करावी लागली. मात्र, एकूण विद्यार्थी संख्या लक्षात घेता, निकाल प्रसिद्ध करण्याच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्‍याचे चित्र होते.

MHT CET

सोहम लगड, आदित्य करपे, अमलेश घाटे

दिवसात वेळ मिळेल, तसा अभ्यास केला. या संपूर्ण काळात सोशल मीडियाचा वापर थोडा कमी केला. खासगी शिकवणीचा फायदा झाला. ‘एमएचटी-सीईटी’ प्लॅन बी म्हणून दिली होती. ‘नीट’मध्ये ६८५ गुण मिळाले आहेत. त्यामुळे मला एमबीबीएस करून, डॉक्टर व्हायचे आहे.

सोहम लगड, एसएनबीपी स्कूल, मोरवाडी

अकरावी आणि बारावीला दिवसाला साधारणत: १२ तास अभ्यास केला. परीक्षेच्या काळात आणखी जिद्दीने तयारी केली. पैकीच्या पैकी गुण मिळतील, अशी आशा होती. ही परीक्षा ‘बॅकअप प्लॅन’ म्हणून दिली होती. मला ‘नीट’मध्ये ६९५ गुण असल्याने, चांगल्या कॉलेजांमध्ये एमबीबीएस प्रवेशासाठी प्रयत्न करणार आहे.

आदित्य करपे, फर्ग्युसन ज्युनिअर कॉलेज

‘जेईई अॅडव्हान्स्ड’मध्ये ऑल इंडिया रँक २६७ असल्याने, ‘आयआयटी दिल्ली’मध्ये ‘मॅथ्स अँड कम्प्युटिंग’ शाखेत प्रवेशासाठी प्रयत्न करणार आहे. या परीक्षेच्या तयारीसाठी खासगी क्लास लावला होता. अकरावी आणि बारावी अशा दोन्ही वर्षात सहा ते सात तास अभ्यास केला. त्यामुळे हे यश मिळाले आहे.

अमलेश घाटे, धोंडूमामा साठे ज्युनिअर कॉलेज