विधानसभेत बुधवारी मराठा आरक्षणाच्या बैठकीवर महायुतीने टाकलेल्या बहिष्काराचा मुद्दा गाजला. यावेळी बोलताना विखे पाटील यांनी पवार यांना लक्ष्य केले. राज्याचे चारवेळा मुख्यमंत्री राहूनही त्यांनी आजतागायत मराठा आरक्षणाच्या बाजूने कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला.
महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री केवळ फेसबुकवर होते. तर त्यांचे नेते रिमोटकंट्रोल वर काम करत राहिले. यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण गमवावे लागले असल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केला. मराठा आरक्षणाचे खरे शत्रू कोण हे आतातरी ओळखावे आणि अशा नेत्यांना गावबंदी करावी, असे आवाहनही त्यांनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना केले.
महायुती सरकार हे मराठ्यांच्या बाजूने असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. यासाठी सरकारने एक पाऊल पुढे येऊन सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकून ते मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. यामुळे त्यांच्या या बेगडी मराठा प्रेमाचा आम्ही निषेध करतो, असेही विखे पाटील म्हणाले.
काहींना मराठा म्हणवून घ्यायला लाज वाटते. त्यांना मराठा आहात का? असे विचारल्यावर आम्ही जात मानत नाही, असे त्यांचे उत्तर असते. त्यांनी फक्त एक मराठा लाख मराठा म्हणून दाखवावे. ते समाजाचा विश्वासघात करत आहेत, अशी बोचरी टीका विखे यांनी पवार यांच्यावर केली. तसेच त्यांच्या या राजकारणाला जनता कधीही माफ करणार नाही, असेही विखे म्हणाले.