उमेदवारी जाहीर होताच श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के शिवतीर्थवर, राज ठाकरे मुंबईत सभा घेणार

मुंबई : मुंबईतील बहुप्रतिक्षीत ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून अनुक्रमे नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर दोघांनीही मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांचे निवासस्थान शिवतीर्थवर जाऊन भेट घेतली. राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी जाहीर मेळाव्यातून महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ठाणे आणि कल्याणमध्ये मोठी ताकद असलेल्या मनसेचे आभार मानण्यासाठी शिवसेना व भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यातून केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर, मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ कामही सुरू केले आहे. आज उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगोलग कल्याण आणि ठाणे मतदारसंघातील श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.
ठाण्यातून नरेश म्हस्के, कल्याणमधून श्रीकांत शिंदे; शिवसेनेकडून उमेदवारांची घोषणा

महायुतीच्या उमेदवारांना त्यांच्या निवडणुकीकरिता शुभेच्छा दिल्या, असे राज यांनी भेटीनंतर सांगितले. तर महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ राज ठाकरे यांच्या सभा होतील, असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

सर्वसामान्य कार्यकर्त्याला लोकसभेची संधी दिली, हे फक्त शिवसेनेतच होऊ शकतं | नरेश म्हस्के


केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या समर्थनार्थ राज ठाकरे प्रचार सभा घेणार आहेत. ४ मे रोजी ५ वाजता राज यांची कणकवलीत जाहीर सभा होणार आहे. ठाण्यात शिंदेसेनेचे नरेश म्हस्के यांच्याविरोधात ठाकरे यांच्या शिवसेनेच्या राजन विचारेंचे आव्हान असणार आहे तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचे आव्हान असणार आहे.