मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची चाचपणी करताना दिसत आहेत. विधानसभेच्या २०० ते २२५ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करा, अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्या आहेत.
राज ठाकरे काय म्हणाले?
महायुती किंवा महाविकास आघाडीचं जागावाटप काही ठरत नाही. मी कुणाच्याही दारात जागा मागायला जाणार नाही, कुणाशीही जागावाटपाची चर्चा करणार नाही. आपल्याला विधानसभेच्या २०० ते २२५ जागांवर निवडणूक लढवायची आहे.
लोकांच्या मनात उद्धव ठाकरेंविषयी राग आहे. उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान मराठी माणसाचं नाही. मराठी मतदार आपली वाट बघतोय. ठाकरेंना झालेलं मतदान हे मोदी विरोधातील मतदान आहे. उद्धव ठाकरेंना मुस्लिमांचं मतदान झालं, अशा शब्दात राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्ते-पदाधिकारी यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम केलं.
राज ठाकरेंनी मनसेच्या नेत्यांना मतदारसंघांचं वाटप केलं आहे. वरळीत राज ठाकरेंच्या वाढदिवसाचे पोस्टर संदीप देशपांडे यांनी लावल्याने ते आदित्य ठाकरेंविरुद्ध या मतदारसंघातून उतरणार असल्याची चर्चा आहे. तर बाळा नांदगावकर शिवडीतून लढण्याची चिन्हं आहेत.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
दरम्यान, लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभेला मात्र महायुतीपासून फारकत घेत स्वबळाची हाक का दिली, असा प्रश्न विचारला जात आहे. मनसे महायुतीत लढण्यास त्यांच्या वाट्याला जेमतेम ४० जागा येण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे १०५ विद्यमान आमदार असून त्यांनी १५० हून अधिक जागा लढवण्याचा निर्धार केला आहे. घटकपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचेही प्रत्येकी ४०-४० आमदार आहेत. अशा परिस्थितीत एक आमदार असलेल्या मनसेच्या वाट्याला महायुतीत ४० हून अधिक जागा येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे युतीत आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी राज ठाकरेंनी स्वबळाची पुडी तर सोडली नाही ना, असाही सवाल उपस्थित होत आहे.