काही काळासाठी होते भीतीचे वातावरण
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याच्या परिसरात साप आढळला आहे. ही बातमी वाऱ्याप्रमाणे पसरली आणि काही काळ परिसरात भीतीचे वातावरण होते. पण तात्काळ सर्प मित्रांना बोलवून या सापाला पकडण्यात आले आणि त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम सर्प मित्रांनी केले.
गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंब वांद्रे येथील कलानगरात वास्तव्यास आहे. वांद्रे परिसरातील कलानगर भाग हा खाडी परिसरावर वसलेला आहे. त्याच ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्री बंगला बांधला होता. खाडी परिसर असल्याचे या ठिकाणी अनेक झाडे-झुडूप आहेत, त्याच झाडाझुडपांमध्ये साप आणि काही सरपटणारे प्राणी आढळतात. त्यापूर्वीही मातोश्री निवासस्थानच्या परिसरात अनेकदा साप आढळण्याच्या घटना घडल्या आहेत.
यापूर्वीही विषारी सापाने केली होती ‘मातोश्री’मध्ये एन्ट्री
दरम्यान यापूर्वीही २०२३च्या ऑगस्ट महिन्यात ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याच्या परिसरात विषारी साप शिरला होता. मातोश्री बंगल्याच्या आवारात दुपारच्या सुमारास कोब्रा शिरल्याची बातमी आली होती. साधारण चार फूट लांबीचा साप परिसरात आढळला होता. एका पाण्याच्या टाकीमागे वेटोळे घालून हा साप तेथील कर्मचाऱ्यांना तो दिसला होता.
चार फूट साप दिसल्यानंतर त्वरित वाईल्ड लाईफ ॲनिमल प्रोटेशन ॲन्ड रेस्क्यू असोशिएशन या संस्थेला फोन करुन सर्पमित्रांना बोलवण्यात आले. मातोश्रीवरुन या संस्थेला बंगल्याच्या आवारात साप फिरत असून सर्पमित्राची मदत हवी असल्याचा निरोप गेला होता. त्यानंतर रोशन शिंदे आणि अतुल कांबळे हे दोन सर्पमित्र मातोश्री बंगल्यावर पोहोचले होते. त्यांनी सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं होतं.