उत्तर मध्यमध्ये गायकवाड, निकमांनंतर आणखी एक बडा चेहरा निवडणूक रिंगणात? अपक्ष लढण्याचे संकेत

मुंबई: उत्तर मध्य मुंबईतून महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार कोण या प्रश्नाचं उत्तर गेल्या चार दिवसांमध्ये मिळालं. महाविकास आघाडीनं २ दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर काल भाजपनं ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना तिकीट जाहीर केलं. यानंतर आता याच मतदारसंघातून आणखी एक ख्यातनाम चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध भाजपचे उज्ज्वल निकम असा सामना रंगेल. याच मतदारसंघातून मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त संजय पांडेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. पांडे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करु शकतात. त्यामुळे उत्तर मध्य मुंबईत रंगतदार लढत होऊ शकते. राजकारणाचा प्रदीर्घ उमेदवार असलेल्या गायकवाड विरुद्ध कायद्याचे जाणकार असलेले निकम विरुद्ध माजी पोलीस अधिकारी पांडे असा सामना या मतदारसंघात पाहायला मिळू शकतो.
असली शिवसेनेला ‘असली’ वागणूक? भाजपचं तेच तेच, शिंदेंपुढे वाढता पेच; कुठे कुठे होतेय दमछाक?
मतदारसंघातील अनेक नागरिकांनी आपल्याकडे निवडणूक लढण्याचा आग्रह धरल्याचं संजय पांडेंनी सांगितलं. नागरिकांच्या आग्रहावर मी विचार करत आहे. याबद्दल कोणताही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही, असं पांडे यांनी सांगितलं. राज्यात ठाकरे सरकार असताना, फेब्रुवारी २०२२ मध्ये पांडे यांच्याकडे मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तपदाची धुरा देण्यात आली होती. मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं सापडल्याचं प्रकरण देशभर गाजलं. त्यावेळी परमबीर सिंह पोलीस आयुक्त होते. प्रकरण उघडकीस येताच सिंह यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यांची जागा पांडे यांनी घेतली.

मी अजातशत्रू, मला कोणीच शत्रू नाही; उमेदवारी मिळताच उज्वल निकम थेटच बोलले

संजय पांडे यांच्या कार्यकाळात भाजपच्या नेत्यांशी संबंधित प्रकरणांचा तपास सुरू झाला. पांडे जून २०२२ मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर बहुतांश प्रकरणांचा तपास बंद झाला. निवृत्तीनंतर पांडेंची सक्तवसुली संचलनालयानं आणि केंद्रीय अन्वशेष विभागानं चौकशी केली. सेबीच्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सीबीआयनं त्यांच्याविरोधात दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवले. पहिल्या प्रकरणात पांडे यांचा आरोपी म्हणून उल्लेख नव्हता. पण त्यांच्या कंपनीचा उल्लेख होता. सीबीआयनं या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केला. दुसऱ्या प्रकरणात पांडे यांचा आरोपी म्हणून उल्लेख होता. ते पाच महिने तुरुंगात होते. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला.