वातावरणातील घडामोडींमुळे पुण्यामध्ये सगल चार दिवस कमाल तापमान ४१ अंशाच्या पुढे, तर जिल्ह्यातील काही भागांत पारा ४३ अंशावर पोहोचला होता. किमान तापमानही २३ अंशाच्या पुढे होते. दिवसा उन्हाच्या तीव्रतमुळे बसणारे चटके, गरम वारे आणि घामाच्या धारांमुळे नागरिकांचे हाल झाले होते. बुधवारी महाराष्ट्र दिनाची सुट्टी असतानाही नागरिकांनी उन्हामुळे घराबाहेर पडणे टाळले. मात्र, सायंकाळनंतर गार वारा सुटल्याने सगळ्यांनाच दिलासा मिळाला. अनेक दिवसानंतर मध्यरात्री, पहाटे हवेत गारवा जाणवला. मात्र, गुरुवारी सकाळी अकरानंतर पुन्हा ऊन वाढले. आकाश निरभ्र असल्याने दुपारी रस्त्यावरून फिरताना उन्हाचे चटके बसत होते.
दोन दिवसांच्या तुलनेत तापमानात थोडी घट होऊन ३९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. उपनगरांतही काही भागांत तापमानात घट नोंदवण्यात आली. पुण्यासह मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तापमानात थोडी घट झाली. राज्यातील उच्चांकी तापमान ४३ अंश सेल्सिअस चंद्रपूरमध्ये आणि नीचांकी तापमान १७.५ अंश सेल्सिअस नगरमध्ये नोंदवण्यात आले.
पुण्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
तळेगाव ढमढेरे ४२.४
मगरपट्टा ४२
कोरेगाव पार्क ४०.८
वडगाव शेरी ४०.७
आंबेगाव ४०.६
शिवाजीनगर ३९.७
हवेली ३९.२
एनडीए ३९.५
सहा ते १० मे दरम्यान पाऊस?
उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अजून चार दिवस कायम राहणार असून, सहा मेनंतर तापमानात घट होईल. मात्र, सहा ते १० मे दरम्यान पुण्यासह मध्य महाराष्ट्र, कोकणात काही भागांत पाऊस पडणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे. पुण्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान मंगळवारी (सात मे) असून, त्या दिवशी पाऊस दिवसभर पडणार की संध्याकाळी, पावसामुळे मतदानाला अडथळा येणार का, याबद्दल सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत.