१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
ओम ऊर्फ बंटी सुनील भालेराव (वय १९, रा. कळंब, सहाणे मळा, आंबेगाव) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी आमदार मोहिते यांचा पुतण्या मयूर साहेबराव मोहिते याला मंचर पोलिसांनी अटक केली. आरोपीला घोडेगाव न्यायालयात हजर केले असता, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत नितीन रामचंद्र भालेराव यांनी मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अपघातानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार होण्याचा प्रयत्न करीत होता. ग्रामस्थांनी त्याला रोखून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची चर्चा असून, आमदार मोहिते यांनी त्याचे खंडन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावरून मयूर मोहिते भरधाव मंचरकडे जात होता. त्या वेळी ओम भालेराव दुचाकीवरून कळंबच्या दिशेने जात होता. तेव्हा एकलहरे गावाजवळ मयूरने मालवाहू वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जायचा प्रयत्न केला. समोरून येणाऱ्या दुचाकीला कारने धडक दिली. हा अपघात एवढा गंभीर होता, की दुचाकी आणि ओम काही फूट उंच उडाले होते. यात ओम आणि त्याच्यासोबत असलेली व्यक्ती गंभीर जखमी झाले. त्यांना मंचर येथील ‘ट्रॉमा केअर सेंटर’मध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचारांपूर्वीच ओमचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
अपघातानंतर मयूरने पळून जायचा प्रयत्न केला असता एका ग्रामस्थाने दुचाकी आडवी घालून त्याला रोखले. मात्र, मोहिते कारमधून उतरला नाही. तोपर्यंत घटनास्थळी ग्रामस्थ जमा झाले होते, अशी चर्चा आहे. ग्रामस्थांनी अपघाताची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी रात्री उशिरा मयूरवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा सहायक निरीक्षक सोमशेखर शेटे तपास करीत आहेत.
मोहितेने जखमींना मदत केली नाही
अपघातानंतर मयूर मोहितेने पळून जायचा प्रयत्न केला. त्याने जखमींना काहीही मदत केली नाही किंवा त्याचा प्रयत्नही केला नाही, असे स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितले. अपघातानंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी मंचर पोलिस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी त्यांना शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
‘एकुलता एक मुलगा गेला’
कळंबच्या सहाणे मळा येथील प्रगतिशील शेतकरी सुनील भालेराव यांचा ओम एकुलता एक मुलगा होता. तो अविवाहित होता; अतिशय मनमिळावू आणि समंजसही होता. पोलिसांनी योग्य तपास करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच संतापलेले नागरिक शांत झाले.
‘मृत तरुणाच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी’
‘अपघात कसा झाला, याबाबत कोणाला काहीच कल्पना नाही. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. घडलेली गोष्ट शंभर टक्के चुकीची आहे. मी मृत तरुणाच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असून, वातावरण शांत झाल्यावर मी स्वतः त्यांची भेट घेईन. मी चुकीच्या गोष्टीचे समर्थन करीत नाही आणि करणार नाही,’ अशी प्रतिक्रिया आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली.