पुणे लोकसभेचे काँग्रेस उमेदवार म्हणून आमदार रवींद्र धंगेकर यांची घोषणा झाल्यानंतर बागूल यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. काँग्रेस भवनाच्या दारातच आंदोलन करून प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर त्यांनी नागपुरात जाऊन फडणवीस यांची भेटही घेतली. या भेटीनंतर ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी अटकळ राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत होती.
त्यांनी काँग्रेस भवनाच्या दारात केलेल्या आंदोलनानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात अचानक घेतलेल्या बैठकीलाही ते अनुपस्थित होते. या वेळी बागूल यांची समजूत काढा, अशी सूचना थोरात यांनी केली होती. त्यानंतरही बागूल यांच्याशी कोणीही संपर्क साधला नसल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी नागपुरात फडणवीस यांची भेट घेतल्याची कुजबूज होती, तर आबा बागूल पक्ष सोडणार नाहीत. त्यांनी व्यक्तिगत कामासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असावी, अशी शक्यता शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी व्यक्त केली होती.
या सर्व घडामोडी सुरू असताना थोरात यांनी त्यांच्या पुढील भेटीदरम्यान बागूल यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली होती. काँग्रेसचे उमेदवार धंगेकर हे दोन दिवसांपूर्वी बागूल यांच्या निवासस्थानी गेले होते. त्या वेळी त्यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसकडून बागूल यांची काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडणार आहे. काँग्रेसकडून माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय दिला आहे आणि प्रचारात तातडीने सक्रिय होणार आहे. प्रामाणिकपणे संघटना बांधण्याचे काम करणार.- आबा बागूल, माजी उपमहापौर
पर्वती काँग्रेसकडे?
आगामी विधानसभा निवडणुकीत पर्वती विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घेणार असल्याचे आश्वासन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आबा बागूल यांना दिल्याचे समजते. बागूल सहा वेळा नगरसेवक म्हणून कार्यरत होते. महापालिकेतही ते उपमहापौर, स्थायी समिती नेते, गट नेते, विरोधी पक्षनेते या पदावर त्यांनी काम केले आहे. आपल्याला एकदाही विधानसभेची संधी देण्यात आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा सलग तीन वेळा पर्वती विधानसभेत पराभव झाला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आगामी निवडणुकीत काँग्रेसकडे घ्यावा, अशी आग्रही मागणी बागूल यांनी केली होती. त्यास हिरवा कंदील दाखविण्यात आल्याची चर्चा आहे.