भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह राज्यातील मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. अधिवेशनाच्या उद्घाटन सत्राला प्रकृती अस्वास्थ्यामुळे नितीन गडकरी अनुपस्थित असल्याने गडकरींऐवजी फडणवीस यांनी उद्घाटन सत्राच्या समारोपाचे भाषण केले. या भाषणात त्यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या घटलेल्या जागांमागील कारणे विषद करताना विरोधकांच्या फेक नरेटिव्हला उत्तर न देणे ही चूक असल्याचे अधोरेखित केले. तसेच विरोधकांचा फुगा विधान परिषद निवडणूक निकालांत आपण फोडला असून विधानसभा निवडणुकांतही त्याची पुनरावृत्ती करायची आहे, असे सांगत भाजप कार्यकर्त्यांमध्ये जान भरली.
आदेशाची वाट पाहू नका, विरोधकांना ठोकून काढा
लोकसभा निवडणुकांत विरोधकांच्या खोट्या प्रचाराला जनता बळी पडली. आपण त्यांच्या खोट्या प्रचाराला उत्तर देण्यात कमी पडलो, हे मान्यच करावे लागेल. भाजप कार्यकर्त्यांकडून नेहमी एक चूक होते. आपण विरोधकांना उत्तर देण्यासाठी, वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहत बसतो, हेच आपले चुकते पण आता आदेशाची वाट पाहू नका. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला खोडून काढा, त्यांच्या भाषणांना ठोकून काढा, असे आदेश देतानाच फक्त आपल्याच नेत्यांवर बोलून पुढील तीन-चार दिवस आम्हाला उत्तरे द्यावी लागणार नाहीत, याची काळजी घ्या, असे फडणवीस यांनी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना सांगितले.
लाडकी बहीण योजनेसंदर्भात विरोधकांचे मोठे षडयंत्र
राज्यातील महिलांच्या मदतीसाठी आपण लाडकी बहीण योजना सुरू केलेली नसून त्यांच्या सन्मानासाठी ही योजना सुरू केल्याचे सांगत विरोधकांना आपली योजना हाणून पाडायची आहे. एकीकडे योजनेच्या बॅनरवर आपले फोटो लावून प्रचार करतायेत तर दुसरीकडे ही योजना बंद करण्यासाठी न्यायालयाची दारे ठोठवत आहेत. महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घ्यायचे पण शासनाकडे जमाच करायचे नाहीत, जेणेकरून अर्ज करूनही पैसे मिळाले नाहीत म्हणून महायुती सरकारविरोधात महिलांच्या मनात रोष निर्माण होईल, असा विरोधकांचा डाव आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.
लग्नाला गेला तरी आपल्या सरकारच्या योजना सांगा
त्याचवेळी भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सावध करताना फडणवीस म्हणाले, “तुम्ही कुणाच्या लग्नात जरी गेलात तरी आपल्या योजनांविषयी सांगत राहा. आपल्या सरकारच्या चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा. लोक वैतागले तरी चालतील पण त्यांना योजना समजावून सांगा कारण पब्लिक मेमरी शॉर्ट असते”.
आमदार-खासदारांना कानपिचक्या
त्याचवेळी विरोधकांना उत्तरे देण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांबरोबरच लोकप्रतिनिधींनी देखील पुढाकार घेतला पाहिजे. पण दुर्देवाने लोकप्रतिनिधी देखील त्यांच्या समाजमाध्यांवरून पोस्ट करत नाहीत, अशी खंत व्यक्त करत निवडणूक म्हणजे आता केवळ जमिनीवरची लढाई राहिली नाही तर त्यात तंत्रज्ञानाचा वाटा मोठा असल्याने आपण त्यात पाठीमागे राहायला नको, ही काळजी घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.