आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता… भरसभेत अमोल कोल्हेंचे अजितदादांना चॅलेंज

पुणे (शिरुर) : आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल, अशा शब्दांत महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार थेट आव्हानच दिले आहे. ‘मी शिवसिंहाची औलाद असून आता थांबणार नाही… विधानसभा बाकी आहे, करारा जबाब मिलेगा,’ असे खडेबोल देखील कोल्हेंनी अजितदादांना सुनावले आहेत.

शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यात अटीतटीचा सामना रंगणार आहे. चौथ्या टप्प्यात मतदान असलेल्या शिरुर मतदारसंघातील प्रचार तोफा शनिवारी थंडावल्या. यादरम्यान दोन्ही गटाकडून अनेक वार-प्रहार करण्यात आले. अजित पवारांनी एका सभेत बोलताना अमोल कोल्हेंवर टीकास्त्र डागले होते. यालाच प्रत्युत्तर देत अमोल कोल्हेंनी आपल्या शैलीत अजित पवारांना आव्हान दिले आहे.
काकांनंतर आता पुतण्याही भिजला, सातारच्या सभेची चाकणमध्ये पुनरावृत्ती; वारं फिरणार?
डॉ. कोल्हे म्हणाले, राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला माझ्याविरोधात १२ सभा घ्याव्या लागत असतील तर हा माझा गौरव आहे. माझं काम बोलतं, म्हणून इथं अडकून पडावं लागलं. म्हणून आदरणीय दादांना विनम्रतेने सांगतो, साधं मांजर सुद्धा कोंडून मारायचा प्रयत्न केला तर प्रतिहल्ला करतंच. मी तर शिवसिंहाची औलाद आहे, थांबणार नाही, अजून विधानसभा बाकी आहे करारा जबाब मिलेगा. आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघायची सुद्धा तयारी ठेवा.

दादा आपसे बैर नहीं, लेकीन बीजेपी की खैर नहीं हा आमचा बाणा आहे. ज्या भाजपने आमचा अपेक्षाभंग केला त्यांची तळी तुम्ही उचलत आहात, अशा शब्दांत कोल्हेंनी अजितदादांना सुनावले आणि प्रचारातील मुद्द्यांवरुन सल्ला देत पुढे म्हणाले की, ‘कडेवर घेतलेल्या उमेदवाराच्या प्रचारात पालकमंत्री व्यस्त आहेत. प्रचारातून बाहेर या आणि बिबट्याच्या प्रश्नांवर लक्ष द्या. बिबट्याचा प्रश्न हा माझ्या माणसांसाठी गंभीर प्रश्न आहे, ज्याकडे राज्यसरकार दुर्लक्ष करत आहे.’
Loksabha Elections: प्रचारतोफा थंडावल्या; पुणे, शिरुर, मावळसह राज्यातील ‘या’ ११ मतदारसंघांत उद्या मतदान
दरम्यान आढळराव पाटील यांच्या कंपनीबाबत प्रश्न उपस्थित करण्याच्या मुद्द्यावरुन नोटीस आल्याने कोल्हे यांनी अजितदादांना पुन्हा धारेवर धरले. ते म्हणाले, प्रश्न विचारले तेव्हा रामलिंग महाराजांची शपथ घेतली, आणि सांगितलं माझा काही संबंध नाही. मराठी माणूस उद्योगपती असल्याचा अभिमान आहे. पण महाराष्ट्रात भूमिहीन शेतमजूर जो भारतात असोत त्याचा अमेरिकेत बंगला असतो, याचं गौडबंगाल कळलं नाही. कितीही नोटीस आल्या तरी त्याचा विचार करत नाही. कारण, प्रश्न सर्वसामान्य जनतेचा आहे. जनहिताचे, लोकशाहीचे प्रश्न मी विचारतच राहणार.’