आतड्यांना जन्मजात पीळ, वाराणसीतील चार वर्षीय मुलाच्या दुर्मिळ आजारावर पुण्यात यशस्वी उपचार

प्रतिनिधी, पुणे : आतड्याला पीळ पडलेल्या चार वर्षांच्या मुलावर य़शस्वी शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या मुलाला ‘मिडगट व्हॉल्व्हुलस’ हा आजार झाला होता. हा आजार गंभीर असून, प्रामुख्याने नवजात बालके आणि मुलांमध्ये आढळून येतो. हा मुलगा मूळचा वाराणसीचा असल्याने पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वाराणसीच्या रुग्णालयात या मुलावर शस्त्रक्रिया झाली. मात्र, प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याचे गुंतागुंत निर्माण झाली होती. अशा स्थितीत या मुलाने तीन महिने काढले.
प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने नातेवाइकांच्या ओळखीने त्याला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या तपासणीत आतड्याला पीळ पडल्याचे अचूक निदान झाले. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्या वेळी मुलाचे स्नायू कमकुवत झाले होते. ओटीपोट फुगलेले आणि अतिसारही झाला होता.

गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्यांच्या कष्टाचे चिज, कारागृहात काम करीत मिळविले अडीच कोटींचे उत्पन्न
उपचार काय केले?

– मुलाला सुरुवातीला स्थिर करण्यात आले. त्यानंतर लहान मुलांच्या पोटाच्या विकारांचे तज्ज्ञ असलेल्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टने तपासले.

– त्यानंतर पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे पालकांना सांगण्यात आले.

– शस्त्रक्रिया करताना आतडे चिकटल्याचे दिसले. त्यामुळे आतड्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला होता.

– ही चिकटलेली आतडी वेगळी करण्यात आली, अशी माहिती ‘सूर्या मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’चे संचालक डॉ. सचिन शहा यांनी दिली.

– जन्मल्यानंतर पहिल्या काही आठवड्यातच, आतड्यांमधील जन्मजात विसंगती हे या आजाराचे मूळ आहे. यामध्ये आतड्याला पीळ पडतो.

– वरच्या ओटीपोटात ताण निर्माण होणे, पित्ताच्या उलट्या होणे आणि ओटीपोट नाजूक होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत.