आघाडीने युतीची घोडदौड रोखली, दिग्गजांचा पराभव, आघाडीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य

प्रतिनिधी, मुंबई : देशात ‘अब की बार ४०० पार’ तर राज्यात ‘४५ प्लस’चे मिशन घेऊन लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुतीची घोडदौड रोखण्यात राज्यातील महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. राज्यातील ४८ लोकसभा जागांपैकी ३१ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. तर १३ जागा जिंकत काँग्रेस हा राज्यात मोठा पक्ष ठरला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नऊ जागांवर विजय मिळवत आपला पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने बारामतीसह आठ जागा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नामोहरम केल्याचे दिसले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला केवळ एकच जागा जिंकता आली. महाविकास आघाडीच्या लाटेत महायुतीचे बालेकिल्ले जमीनदोस्त झाले असून भाजपला २३ जागांवरून नऊ जागांवर समाधान मानावे लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मात्र सात जागांवर विजय संपादन केला.
Lok Sabha Election Result: मुंबईवर वर्चस्व आघाडीचे, सहापैकी चार जागा खिशात, महायुतीला दोनवर समाधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सलग १० वर्षांच्या केंद्र सरकारच्या कालावधीत महागाई, वाढती बेरोजगारी, शेतीमालाला कमी भाव, शेतकरी आत्महत्या, शहरी आणि ग्रामीण भागात असलेला आक्रोश, प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर भाजप राज्यघटना बदलणार या आणि इतर मुद्द्यांवर महाविकास आघाडीने भाजपच्या विरोधात प्रचाराच्या सुरुवातीपासूनच रान उठविले होते. त्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती या लढाईत राज्यातील नागरिकांनी महाविकास आघाडीला साथ दिल्याचे चित्र दिसत आहे.

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणीला मंगळवारी सकाळी आठ वाजता सुरुवात झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार हळूहळू आघाडी घेताना दिसत होते. सकाळच्या सत्रात महायुती आणि महाविकास आघाडी समान जागांवर आघाडीवर होते. मात्र, दुपारनंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी सातत्याने मतमोजणीचे कल बदलत होते. अखेर आघाडीची सरशी झाली आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. त्यांनी शिवसेना भवन गाठत जल्लोष केला.

-भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसची दाणादाण

-शिवसेनेला मर्यादित यश

– १३ जागा जिंकत काँग्रेस ठरला सर्वांत मोठा पक्ष

– दानवे, कपिल पाटील, डॉ. भारती पवार यांचा पराभव

राज्यातील निकाल

महायुती

भाजप : ९,

शिवसेना : ७

राष्ट्रवादी : १

महाविकास आघाडी

काँग्रेस : १३

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : ९

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष : ७

अपक्ष : १