आकड्याचा घटला जोर, शिंदेंच्या आमदारांकडून परतीचे दोर? घरवापसीसाठी ठाकरेसेनेकडून महत्त्वाची अट

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. भाजपच्या जागा २३ वरुन ९ वर आल्या, तर शिंदेसेनेचा आकडा १३ वरुन ७ वर आला. त्यानंतर आता शिंदेसेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. शिंदेसेनेचे ६ आमदार ठाकरेसेनेच्या संपर्कात आहे. घरवापसी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होऊ शकतो.

एकनाथ शिंदेंनी २ वर्षांपूर्वी शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड केलं. ४० आमदारांनी त्यांना साथ दिली. यातील ६ आमदार परतीचे दोर लावण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी ठाकरेसेनेशी संपर्क साधला आहे. गद्दारी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात घेणार नाही, अशी भूमिका याआधी उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे. पण लोकसभेतील गणितं आणि विधानसभा निवडणुकीची तयारी पाहता काही आमदारांसाठी ठाकरे त्यांची भूमिका बदलू शकतात.
विधानसभेला सहन करणार नाही! भाजपचा आकडा घटताच शिंदेसेनेचा आवाज वाढला; मित्रपक्षावर थेट निशाणा
बंडानंतर शिंदेसेनेत गेलेले, पण तिथे जाऊन तटस्थ राहिलेले आमदार घरवापसी करु शकतात. त्यांना ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल मिळू शकतो. शिंदेंसोबत गेलेल्या, पण ठाकरेसेनेवर जहरी, विखारी टीका न करणाऱ्या आमदारांना ठाकरेसेनेचे दरवाजे उघडले जाऊ शकतात. तटस्थ भूमिका हीच घरवापसीची महत्त्वाची अट असेल. त्यामुळे येत्या काही दिवसांत ठाकरेसेनेत इनकमिंग होण्याची शक्यता आहे. ठाकरेसेनेत परतू इच्छिणाऱ्यांमध्ये मुंबईतील काही आमदारांचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील प्रत्येकी एक आमदार ठाकरेसेनेत परतू इच्छितो. एबीपी माझानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
ना बिनशर्त पाठिंबा, ना प्रचारसभा; स्वत:ला भोपळा, पण ‘या’ पक्षानं वाचवल्या भाजपच्या १४ जागा
ठाकरेसेनेत संभाव्य इनकमिंगवर बोलताना पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी सूचक विधान केलं. परतणाऱ्यांचा आकडा ४ काय १६, २० किंवा मग ४० देखील असू शकतो. मी एकाही आमदार, खासदाराला निवडणुकीत पडू देणार नाही, याची गॅरंटी शिंदेंनी घेतली होती. पण तसं काही घडलं नाही. अनेकांची तिकिटं कापली गेली. तर काहींचा पराभव झाला, याकडे अहिर यांनी लक्ष वेधलं.

लोकसभा निवडणुकीत आम्ही तुम्हाला मदत करतो. विधानसभेत तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या, अशी भूमिका शिंदेंकडे असलेल्या अनेक आमदारांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात घेतली होती. मोदींचा चेहरा वापरुन, बाळासाहेबांचे विचार सांगूनही महायुतीला मतदारांनी नाकारलं. त्यांच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्येच महायुतीचे उमेदवार पिछाडीवर पडले. त्यामुळे आता हे आमदार त्यांच्या भविष्याचा विचार करतील. पण आमची भूमिका स्पष्ट आहे. अडीअडचणीच्या काळात पक्षाला साथ देणारे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदारांच्या पाठिशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत, यापुढेही राहू. कोणतीही रसद नसताना, अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना लढलेले उमेदवार, कार्यकर्ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, असं अहिर यांनी सांगितलं.