भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आज पुण्यात बोलत होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी आरक्षण, मविआ, विधानसभा निवडणूक अशा विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी आरक्षणावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आरक्षणाचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका होती. ते आरक्षण टिकणार असावं, ही देखील आमची भूमिका आहे. तसेच समाजाच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीचा विचार करून आरक्षण दिलं जावं ही आमची ठाम भूमिका आहे. देवेंद्र फडणीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला होता, पण दुर्दैवानं ते आरक्षण टिकू शकले नाही, असं ते म्हणाले.त्यानंतर उद्धव ठाकरे सरकार आलं. सुप्रीम कोर्टात मराठा समाज सामाजिक आर्थिक दुर्बल हे उद्धव ठाकरे मांडू शकले नाहीत, त्यामुळे सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकू शकलं नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न आमचा आहे, असं ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीसाठी २१ जुलै पासून पुण्यात भाजपचं अधिवेशन होणार आहे. राज्यातील ५३०० कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यासाठी सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, नरसेवक असणार आहेत. या अधिवेशनासाठी अमित शहा पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. नितीन गडकरी, पियुष गोयल, आमचे प्रभारी भुपेंद्र यादव देखील असणार आहेत, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आकडा सांगणार नाही पण राज्यात महायुतीच सरकार येणार हे नक्की आहे. पुढील मुख्यमंत्री महायुतीचा होणार हे नक्की आहे. विधानसभेसाठी भाजपचा नवा नारा, ‘निवडणूक जिंकणार पण आकडा नाही सांगणार’, असा असल्याचे त्यांनी सांगितले. विशालगड प्रकरणीही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जिथं आपली पवित्र स्थान आहेत तिथं अतिक्रमण होऊ नये. ते कुणाच्या काळात झालं हे माहिती आहे. पण विशाळगडावर आणि प्रतापगडावर असणार अतिक्रमण काढलं पाहिजे. पण राज्यात कायदा सुव्यवस्था टिकणे गरजेचं आहे. मात्र कुठल्याच गडावर अतिक्रमणे होऊ नये, असं माझं स्पष्ट मत असल्याचे ते म्हणाले.