प्रसाद लाड काय म्हणाले?
ज्या पद्धतीने काल सभागृहात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी माझ्या आई किंवा बहिणीचा जो उच्चार केला, शिव्या दिल्या, त्या सुसंस्कृत महाराष्ट्राला परवडणाऱ्या नव्हत्या, आवडणाऱ्या नव्हत्या, तसा प्रकार कधीही झाला नव्हता, असं प्रसाद लाड म्हणाले.
आईचं २५ वर्षांपूर्वी निधन
माझी आई कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने २५ वर्षांपूर्वी वारली. त्या आईबद्दल अपशब्द काढणं हे विरोधी पक्ष नेत्याला, एका पक्षाच्या नेत्याला किती योग्य वाटतं, याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. ज्या मातोश्रींबद्दल आम्ही नेहमी म्हणतो, ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी होत्या, ज्यांना तमाम महाराष्ट्र मातोश्री म्हणायचा, त्यांच्या पुत्राने – उद्धव ठाकरेंनी याबद्दल प्रश्न विचारले का, हा सवाल माझ्या मनात आहे, असं प्रसाद लाड म्हणाले.
प्रसाद लाड चिडले
एका मातेचा अपमान करणं, सभागृहात बोलणं, महाराष्ट्राला ऐकून दाखवणं, नंतर येऊन मी किती बहादूर आहे सांगणं, माझ्याकडे बोट दाखवलं तर मी बोट कापेन, माझ्यावर दंगलीचे ७६ गुन्हे आहेत, मी मारुन टाकेन, मी खून करेन, यावर मला भाष्य करायचं नाही, असंही लाड म्हणाले.
रात्रभर झोपू शकलो नाही
जिथे शिवसेनेचा, हिंदुत्वाचा उगम झाला, जिथे बाळासाहेबांनी बाळकडू दिलं, अशा परळ लालबाग सारख्या भागात आम्हीही लहानाचे मोठे झालो. सुसंस्कृत असल्याने उत्तराला उत्तर देत नाही. परंतु मी काल रात्रभर झोपू शकलो नाही. ज्या पद्धतीने माझ्या आईबद्दल शिव्या निघाल्या, त्या माझ्या मनाला दुःख देऊन गेल्या आहेत, अशा भावना प्रसाद लाड यांनी व्यक्त केल्या.