आंतरजातीय लग्न, मुला-मुलीला कुटुंबियांनी नाकारलं
आंतरजातीय लग्न केल्यामुळे मुलाच्या वडिलांनी मुलीला घरात घेण्यास नकार दिला आणि मुलाला आहे त्या कपड्यावर घराच्या बाहेर काढलं. मुलगा रामोशी समाजातील आहे, तर मुलगी पारधी समाजातील आहे. मुलाच्या घरच्यांना जसं हे लग्न मान्य नव्हतं, तसंच मुलीच्याही घरच्यांना हे लग्न मान्य नव्हतं. पारधी समाजामध्ये मुलीचे आई-वडील मुलांकडून हुंडा घेतात, शिवाय आंतरजातीय लग्न केल्यामुळे त्यांना हे लग्न मान्य नव्हतं. परंतु मुलीने ठाम निश्चय केला होता की मुलाबरोबरच राहायचं. त्यामुळे सुपा पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर मुलीने ठाम सांगितलं, की मी मुलाबरोबर राहणार आहे. त्यामुळे मुलीच्या आईच्या आणि वडिलांचा नाईलाज झाला. शेवटी आलेल्या रीती-रिवाजाप्रमाणे मुलीच्या आई-वडिलांनी मुलाच्या आई-वडिलांकडे एक लाख रुपये हुंड्याची मागणी केली. मुलाच्या आई-वडिलांना हे लग्न मान्य नसल्यामुळे मुलाच्या आई-वडिलांनी हुंडा देण्यास स्पष्ट नकार दिला आणि मुलाला घराबाहेर काढलं.
कालांतराने कुटुंबियांनी दोघांना स्वीकारलं
मुलगा आणि मुलगी दोघेही आहे त्या कपड्यावर घराबाहेर पडल्यामुळे जवळ तर पैसे नव्हते आणि खाण्याची भ्रांत होती. त्यांनी तडक देहू या गावी आपला मुक्काम हलवला. तेथे पुलाखाली राहायचे आणि मिळेल ती खायचं असं दिनक्रम चालू होता. देहू येथील एका हॉटेलमध्ये मुलगी दोन-तीन दिवस कामाला गेली, मात्र तिथे हॉटेल मालकाची वाईट नजर तिच्यावर पडली आणि मुलीने न्याय मागण्यासाठी पुन्हा महाळुंगे पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी दोघांना न्याय दिला.
आज ते नवरा – बायको पाटस या गावी राहत आई-वडिलांजवळ राहतात. आज या दोघांच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झाली असून मुलगी गर्भवती असल्यामुळे मुलाच्या आई-वडिलांनी मुलीला स्वीकारलं. मुलाच्या इतर नातलगांनी स्वीकारलं. तर मुलीच्या आई-वडिलांनी देखील मुलाला जावई म्हणून स्वीकारलं आहे.
नवसपूर्तीसाठी पती-पत्नीची देहू ते पंढरपूर वारी
रूपाली जाधव यांनी मूल होऊ दे असं साकडं विठ्ठलाला घातलं होतं. सहा वर्षानंतर त्यांचा नवस पूर्ण होताना दिसतोय. आज त्या गर्भवती असल्यामुळे त्यांनी ती नवसपूर्ती फेडण्याचा संकल्प केला आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये त्या देहू ते पंढरपूर ही वारी विना चप्पल घालून करणार आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचा आज मुक्काम इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे असून या वारीमध्ये पती – पत्नी नवसपूर्तीसाठी विठ्ठलाकडे पंढरपूरला जात आहेत. सुनील जाधव हा वारी मधील वारकऱ्यांना गंध लावण्याचं विनामूल्य काम करतो.
प्रेमाला जात नसते, आम्ही प्रेम मनावर केलं जातीवर नाही. माझी जात रामोशी, तर पत्नीची जात पारधी आहे. आंतरजातीय विवाह केल्यामुळे आम्हाला जो त्रास झाला आहे तो त्रास इतरांना होऊ नये. आजचे पालक हे जातीमुळे प्रेमविवाह नाकारतात, पण काही पालक जे जात मानत नाहीत प्रेमविवाहला मान्यता देतात आणि घरात घेतात. पारधी समाज हा खरं पाहिलं तर खूप चांगला आहे. त्यांना गरज आहे मार्गदर्शनाची. त्यांना योग्य अयोग्य सांगण्याची गरज असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असल्याचं, सुनील जाधव म्हणाले.
आपण पारधी समाजाला नेहमी संशयातून पाहतो, पारधी समाजाला कायम मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखतो. त्यांना मिळालेली ओळख पुसली गेली पाहिजे आणि ते सुद्धा मुख्य प्रवाहात आले पाहिजेत. माझी पत्नी पारधी समाजाची आहे, मला असं वाटत होतं की माझ्या सासरवाडीतील लोक वाईट असतील, परंतु तसं नाही. माझ्या सासरवाडीतील लोक खूप चांगले आहेत. पारधी समाजातील मुलांना मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं पाहिजे. त्यांना योग्य-अयोग्य शिक्षण मिळाल्यानंतर समजेल. परंतु या समाजाला कायम दुर्लक्षित केलं जातं. मुख्य प्रवाहात येण्यापासून लांब ठेवलं जातं, यामुळेच पारधी समाजाची वाहतात होत आहे, असं सुनील जाधव यांनी सांगितलं.