असली शिवसेना आमचीच कारण… शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंनी ठाकरेंना डिवचलं

प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात १३ लोकसभा मतदारसंघात थेट लढत होती. राज्यात शिंदे गटाच्या तुलनेत ठाकरे गटाला जास्त जागांवर विजय मिळाला आहे. मात्र थेट लढतीत आम्ही जास्त जागा जिंकल्या असून शिवसेना अव्वल असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी केला आहे.

शीतल म्हात्रे काय म्हणतात?

शीतल म्हात्रे यांनी एक्सवर यासंदर्भातील पोस्ट शेअर केली असून त्यासोबत आकडेवारी सादर केली आहे. १३ लोकसभा मतदारसंघात थेट लढत झाली असता शिंदेंच्या शिवसेनेला सात, तर ठाकरेंच्या शिवसेनेला सहा जागा मिळाल्या, याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे. याशिवाय, एकूण मतं, सरासरी मतं, मताधिक्य याबाबतीतही शिंदेसेना सरस असल्याचे आकडे शीतल म्हात्रे यांनी सादर केले आहेत.

उद्धवस्त गटाला मराठी लोकांनी नाकारलं आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी असली शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे, यावर शिक्कामोर्तब केले असा दावा त्यांनी यात केला आहे.


हिरव्या मतांवर उबाठाची मदार, हीच खरी वस्तुस्थिती अशी टीकाही त्यांनी केली आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेला ६० लाख ३८ हजार, तर आमच्या शिवसेनेला तब्बल ६२ लाख ३५ हजार ५८४ मते मिळाली आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

दुसरीकडे, बंडू जाधव यांनी मुस्लिम समाजाची अधिक मतं मिळाल्याबाबत केलेल्या वक्तव्याचाही शीतल म्हात्रे यांनी समाचार घेतला. “लाजा कशा वाटत नाही उबाठाला सांगताना की, आम्ही मुस्लिम मतांच्या जीवावर निवडून आलोय… किमान हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं एकदा स्मरण तरी करायचं होतं… उद्धवस्त गटाच्या विजयाला हिरवी किनार आहे, हे पुन्हा एकदा रहस्य नवाब सेनेच्या खासदारांनी सांगितलं…, हे एक बरं झालं … !!!” असं शीतल म्हात्रे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे.