अशाप्रकारचे अपप्रचार करणे अशोभनीय, आंबेडकरांच्या विधनावर सचिन सावंत यांचे प्रत्युत्तर

म.टा.खास, प्रतिनिधी, मुंबई: अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि भाजप नेत्यांची भेट झाली असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांचा हा दावा तथ्यहीन असल्याची टीका काँग्रेसचे महाराष्ट्राचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला असून अशाप्रकारचे अपप्रचार करणे अशोभनीय असल्याचे त्यांनी शनिवारी एक्सवरुन दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि भाजप नेत्यांची भेट झाली असल्याचा दावा केला. यामुळे देशाच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली असून काँग्रेसने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. याप्रकरणी एक्सवरुन प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भाजपाच्या नेत्यांची भेट झाली असे म्हटले आहे, यात कोणतेही तथ्य नाही. अशा पध्दतीने अपप्रचार करणे हे त्यांना पूर्णपणे अशोभनीय आहे.

निवडणुकीत जनसमर्थन मिळत नाही हे लक्षात आल्याने त्यांची हतबलता दिसत आहे. परंतु अशा सनसनाटी विधानांमुळे लाभ होणार नाही. आमची विनंती आहे की कृपया अशा पध्दतीची विधाने त्यांनी टाळावीत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.