अल्पवयीन बाईकचालकाची धडक, दूरवर उडून दुचाकीस्वाराचा मृत्यू, पुण्यानंतर मुंबईतही भीषण अपघात

प्रतिनिधी, मुंबई : पुणे येथे अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडल्याच्या घटनेमुळे सगळीकडे संतापाची स्थिती असतानाच मुंबईमध्ये अल्पवयीन चालकाने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. इरफान नवाबअली खान (३२) असे मृत तरुणाचे नाव असून जे. जे. मार्ग पोलिसांनी या प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक केली आहे. अल्पवयीन चालकाची रवानगी बालगृहात करण्यात आली आहे.गारमेंटमध्ये काम करणारा इरफान खान हा गुरुवारी सकाळी दुचाकीवरून माझगाव डॉक सर्कल येथून नेसबीट ब्रिजवरून जे. जे. रोडच्या दिशेने चालला होते. नेसबीट पुलावर विरुद्ध दिशेने एक १५ वर्षांचा मुलगा दुचाकीवरून भरधाव वेगाने आला. दुभाजक नसल्याने अल्पवयीन मुलाची दुचाकी इरफानच्या दुचाकीला समोरून धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये इरफान दूरवर फेकला गेला. प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने पोलिसांनी जखमी अवस्थेतील इरफानला रुग्णालयात नेले, मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
Pune Porsche Car Accident : अपघातावेळी चालक पोर्शे कार चालवत होता, अल्पवयीन आरोपीसह बापाचाही ‘सलमान पॅटर्न’चा प्रयत्न

अपघाताची माहिती मिळताच जे. जे. मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीचालकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीमध्ये त्याचे वय १५ असल्याचे समोर आले. बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी या चालकावर तसेच अल्पवयीन असतानाही त्याला वाहन देणाऱ्या वडिलांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन चालकाची वैद्यकीय तपासणी करून त्याची रवानगी बालगृहात करण्यात आली, तर त्याच्या वडिलांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.